रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (21:46 IST)

भाजपकडून पुरस्कार मोहीम सुरु, घोटाळेरत्न, घोटाळेभूषण, घोटाळेवैभव आणि घोटाळेसम्राट असे पुरस्कार देणार

विधिमंडळाचे अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सुधारणा विधयेकावरून ठाकरे सरकार विरोधात १ जानेवारीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, हे आंदोलन सुरु होण्यापूर्वी भाजपने पुरस्कार मोहीम सुरु केली आहे. 
 
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मानकऱ्यांना घोटाळेरत्न, घोटाळेभूषण, घोटाळेवैभव आणि घोटाळेसम्राट असे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली.
 
देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे नाव ठळक करणाऱ्या घटना वर्षभरात घडल्या. त्यात वरच्या क्रमांकावर असलेल्या घोटाळ्यांचे संपूर्ण श्रेय ठाकरे सरकारला द्यावे लागेल. ठाकरे सरकारच्या या कर्तबगारीची दखल घेऊन त्यास जबाबदार असलेल्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे. हजारो उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलण्याची कर्तबगारी दाखविल्याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना या सत्कार मालिकेतील पहिला मानाचा ‘घोटाळेरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार या मोहिमेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे. 
 
भाजपतर्फे राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी हा पुरस्कार समारंभपूर्वक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात येऊन घोटाळ्यांचा नवा अविष्कार दाखविल्याबद्दल टोपे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास घोटाळेरत्न पुरस्काराचे पदक प्रदान करण्यात येणार आहे. 
 
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांचा अभूतपूर्व गोंधळ घालून उमेदवारांच्या मनस्तापास कारणीभूत ठरल्याबद्दल टोपे यांनी उमेदवारांची माफीही मागितली होती. घोटाळे करून त्यावर माफी मागण्याचा मोठेपणा दाखविणारे टोपे हे ठाकरे सरकारमधील एकमेव मंत्री आहेत. त्यामुळे ते या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.