नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. दाऊद टोळीशी संबंध ठेवणाऱ्यांना आणि संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, अशा प्रकारचे फलक घेऊन भाजप पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मलिक राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार, असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहीजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका पहिल्यादिवसापासून आहे आणि आजही ती असणार आहे. त्यामुळे सभागृहात आक्रमकपणे दिवसभरात जे काही करावे लागेल ते भाजपा दोन्ही सभागृहात केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक जोपर्यंत राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत सभागृहात, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आणि रस्त्यांवर आमची लढाई सुरूच राहणार आहे.