सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (16:54 IST)

भाजपकडून विधानपरिषदेसाठी प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. पक्षातील नवे आणि काही पक्षाबाहेरून आलेल्यांना संधी दिली आहे. मात्र एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता अशा दिग्गज नेत्यांना डावललं आहे.
 
धनगर समाजाचे नेते आणि लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतून निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध निवडणूक लढले होते. तेथे त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. पडळकर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जातात. 
 
रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूरचे प्रवीण दटके हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान शहराध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या महाल भागातून अनेक टर्म नगरसेवक आहेत. विधानसभेला त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी निर्माण झाली होती. 
 
भाजपचे चौथे उमेदवार डॉ. अजित गोपछडे हे तसे नवखा चेहरा आहे. विद्यार्थी दशेपासून संघाशी निगडित असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपछडे नांदेडचे आहेत. अंबाजोगाई इथं वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या गोपछडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे.