बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:20 IST)

भाजपाचे बंडखोर माणिकराव कोकाटे यांना एसीबीच्या चौकशीची नोटीस

भाजपाचे बंडखोर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना २०१४ सालच्या एसीबीच्या मालमत्ता प्रकरणी पुन्हा निवडणुकीच्या काळात चौकशी सुरु करण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने कोकाटेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने शहरात चर्चेचा विषय झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असून सुद्धा  तिकीट न मिळाल्याने कोकाटेंची बंडखोरी केली आहे. तर युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कोकाटे यांनी भाजपा मधून बंडखोरी केल्याने चौकशीचा ससेमिरा भाजपने मागे लावला का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.माणिकराव कोकाटे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.
 
या सर्व प्रकरणावर माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देतांना  म्हटले आहे की, मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला अजिबात घाबरतनाही. २०१४ साली माझी चौकशी सुरु केली होती त्यावेळी त्यावेळी ती गुप्त स्वरुपाची होती असे लक्षात येताच मी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांना पत्र लिहिले होते, त्यात मी माझी पूर्ण चौकशी करा अशी मागणी केली होती. त्यावेळी मला जे विचारले आणि कागद पत्रे मागवली ती मी दिली होती. मात्र अचानक मला पुन्हा नोटीस आली असून माझ्याकडे काही विचारपूस आणि कागदपत्रे मागवली आहे. मी त्यांना उत्तर दिले की, लोकसभा निवडणुकीत मी उमेदवार असल्याने या गडबडीत मला पूर्ण लक्ष देणे शक्य होणार नाही, मी चौकशीला तयार असून माझी चौकशी ही निवडणूक संपल्यावर करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
 
कोकाटे माध्यमांसोबत बोलतांना पुढे म्हणाले की, सरकारने मला अजून ओळखले नाही. मी कोणत्याही धमकीला दबावाला बळी पडणार नाही. तर मी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून हे दबाव आणले जात आहेत मात्र मी कोणालाही घाबरत नसून मी चोकाशीला तयार आहे.