मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (19:00 IST)

भाजपाचे किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत आहेत: किशोरी पेडणेकर

“महाभारतात जसे शिखंडी होते, तसं भाजपाचे किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत आहेत. दोन गोष्टी आता लोकांच्या लक्षात आल्या आहेत. आता फ्रॉड हा शब्द बोलायचा नाही. या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या. हे आता प्रचलित धोरण झालं आहे,” असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली. किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत आणि फक्त साडी नेसवणं बाकी आहे. तेदेखील आम्ही करू असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. 
 
वारंवार तक्रारी करत राहायच्या, श्वानासारखा आवाज करत राहायचं आणि लोकांना केवळ डिस्टर्ब करत राहायचं हे सोमय्या यांचं काम असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. “किरीट सोमय्या करत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत हे कायम आम्ही सांगत आलो आहोत. आम्ही कायम त्या शिखंडींना आव्हान स्वीकारून ते सिद्ध करण्यासही सांगत आहोत. सिद्ध झाल्यास कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत. याचा अर्थ त्यांनी कायम आरोप करावे आणि आम्ही आमचा कामधंदा सोडून त्यांच्यामागे आम्ही बोलायला जावं तर ते आम्ही करणार नाही,” असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.