बाप्परे, ‘ड्रेन इन्स्टा’खाल्ल्याने मुलाची अन्ननलिका जळाली
सातारा तालुक्यातील साबळेवाडीमध्ये खाऊच्या पाकिटाऐवजी ड्रेन इन्स्टाखाल्ल्याने मुलाची अन्ननलिका जळाली. साहिल तानाजी पवार (वय १२, रा. साबळेवाडी, पो. वेण्णानगर, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
दुपारी शाळेतून आल्यानंतर भूक लागल्याने साहिल याने गावापासून जवळच असलेल्या एका किराणा दुकानात महिलेला खाऊचे पाकीट मागितले. त्यावेळी त्या महिलेने खाऊच्या पाकिटाऐवजी त्याच्या हातात वाॅश बेशीन स्वच्छ करण्यासाठी वापर करतात ते ड्रेन इन्स्टा पाकीट दिले. खाऊचे पाकीट समजून त्याने पाकीट फोडून संपूर्ण पावडर तोंडात टाकली. त्याचवेळी त्याची जीभ चरचरली म्हणून त्याने एक ग्लास पाणी पिले. ॲसिडयुक्त असलेल्या या पावडरमुळे साहिलची अन्ननलिका जळाली. त्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याचे वडील आणि इतर लोक तेथे आले. त्यांनी साहिलला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दोन दिवसांपासून त्याला बोलता येत नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. साहिलचे वडील तानाजी पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दुकानदार महिलेविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुनंदा शंकर साबळे (रा. साबळेवाडी, पो. वेण्णानगर, ता. सातारा) या महिलेवर (व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोहोचवणे) या कलमान्वे गुन्हा दाखल केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor