शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (21:24 IST)

अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा : मुख्यमंत्री

कोरोनामुळे स्थुल राज्य उत्पन्नात ८ टक्के घट होऊनही कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना देऊन महाराष्ट्र मोठी भरारी घेईल, आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य यंत्रणेला मजबूत करण्यासाठी केलेली तरतूद निश्चितच महाराष्ट्र सुदृढ करणारी ठरेल. सर्व क्षेत्रात घसरण होत असतांना 11.7 टक्के इतकी विक्रमी वाढ नोंदवणाऱ्या कृषी क्षेत्राला अधिक बळकटी देण्यात येईल. हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देतांना समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पाचं कौतुक केले आहे. 
 
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात असतांना महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम जाणवणारच होता. संपूर्ण आर्थिक वर्षात जवळपास आठ महिने राज्याच्या स्थुलराज्य उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारी उद्योग आणि सेवा क्षेत्रासारखी महत्वाची क्षेत्रे टाळेबंदीमुळे बंद होती त्याचा परिणाम ही राज्य अर्थव्यवस्थेवर झाला असला तरी महाराष्ट्र कधीच थांबला नाही आणि थांबणारही नाही. टाळेबंदी उठवल्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रातील अर्थचक्र गतिमान झाले असून भविष्यात कोरोनाचे संकट कमी झाले तर महाराष्ट्र पुन्हा आपल्या सर्व सामर्थ्यानिशी भरारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.