शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (15:42 IST)

सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर परीक्षा

CET exam schedule announced; Examination from 15th September to 10th October Maharashtra News  In Marathi Webdunia Marathi
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत.तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
या परीक्षांसाठी प्रती दिवस जास्तीत जास्त प्रती दिन ५० हजार संगणक उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यातील २५ हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार सेशन संख्या निश्चित करण्यात येईल. ही प्रवेश परीक्षा राज्य शासनाने कोवीड-१९ बाबत जाहीर केलेल्या सूचनांच्या नियमांचे पालन करुन राबविण्यात येणार आहे. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकीटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असेही सामंत यांनी सांगितले. ८६ टक्के विद्यार्थ्यांना प्रथम विकल्पानुसार परीक्षा केंद्र मिळणार आहेत व १४ टक्के विद्यार्थ्यांना उर्वरित विकल्पानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करण्यात येईल व अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरु करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
 
मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लीकेशन, मास्टर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्टस, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा १५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहेत.मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिजनेस ॲडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा दि. 16 ,17 व 18 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहेत.बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलाजी (B.E/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी (B.Pharm/Pharm.D), ॲग्रीकल्चर अँड ॲलाईड कोर्स या परीक्षा दि. 20 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021या दरम्यान होणार आहेत.बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ (5 वर्ष), बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन दि.4,5,6 आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. तसेच बॅचलर ऑफ लॉ-(3 वर्ष ) 4 व 5 ऑक्टोबर 2021, बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल, या परीक्षा दि. 6 व 7 ऑक्टोबर 2021रोजी होणार आहेत. बॅचलर ऑफ फाईन आर्ट दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत, अशी माहिती  सामंत यांनी दिली.
 
या परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल. खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ‘गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे’ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून रु.8 लाख इतकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने घेतला आहे, असेही सामंत यांनी सांगितले. राज्य सीईटी कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.