बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (14:50 IST)

नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी वीज बिल भरण्याची सक्ती करू नये - छगन भुजबळ

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी कृषीपंपाचे थकीत वीज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
 
छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कृषिपंप वाहिनीवरील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देताना संबंधित रोहित्रावरील सर्व कृषी ग्राहकांनी किमान रक्कम भरणे आवश्यक करण्यात आले आहे. २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास ३ हजार तर त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कृषी ग्राहकांनी ५ हजार रुपये भरल्याशिवाय रोहित्र बसविले जात नसल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
 
राज्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र रोहीत्र नादुरुस्त झाल्यास थकबाकी भरून घेण्याचे महावितरणकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रोहित्र फेल झाल्यानंतर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. थकबाकी भरली तरच नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून बसून दिले जात आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थकबाकी भरणे शक्य नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीपंपाची थकीत वीज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी छगन भुजबळ यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.