शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (09:39 IST)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न - छगन भुजबळ

पाच राज्यांच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्याने आणि युती सरकारला पराभव समोर दिसत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील मतदारांना खुश करून कुरवाळण्याचा प्रयत्न आजच्या अंतरिम अर्थसंकल्पातून केला असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्या त्यावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रया व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, गेले पाच वर्ष सरकारच्या कामकाजावर नाराज असलेल्या राज्यातील नागरिकांनी न भूतो न भविष्यती इतके मोर्चे सरकारच्या विरोधात काढले. मात्र सरकारने त्यांची बोळवण करण्यापलीकडे कुठेलेही ठोस पाऊले उचलले नाही.पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर आणि आगामी निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने घोषणा करून राज्यातील जनतेला खुश करून कुरवाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकारच्या या फसव्या घोषणांना राज्यातील जनता भुलणार नाही असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीशी राज्यातील शेतकरी संकटाना समोरे जात असतांना कर्जबाजारी झाला आहे. त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची गरज होती मात्र पात्रतेच्या व निकषांच्या नावाखाली शब्दछल करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. एकीकडे कृषी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजारांची मदत करून काही तासांच्या आत ती पुन्हा परत घेतली ही दुर्दैवाची बाब असून सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. सरकारने औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागातील १४ जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखा लील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने तांदूळ व गहू पुरविण्यासाठी ८९६ कोटी ६३ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.