शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (09:30 IST)

राज्यात पावसाची शक्यता ; कुठे ढगाळ वातावरण, कुठे उन्हाचा चटका वाढला

Chance of rain in the state
देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कुठं थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण, कुठे उन्हाचा चटका वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून तापमानात घट झाल्याने उन्हाळ्याची चाहुल लागली होती. मात्र, बुधवारी रात्रीपासून हवेचा वेग वाढल्याने पहाटेचे तापमान दोन दिवसांपासून १४.५ अंशांवर स्थिरावले.
 
वाऱ्याचा वेग ताशी २४ ते ३३ किमीवर होता. परिणामी पहाटे काही वेळ गारठा जाणवला. तर दुपारी पुन्हा तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जाणवला.मात्र रात्री वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी जाणवली. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ३ फेब्रुवारीनंतर तापमानात तीन ते चार अंश सेल्सीयसने वाढ होईल असाही अंदाज आहे.
 
पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. भारताच्या मैदानी भागात हवामानाचे स्वरूप बदलणार असून १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
 
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे येत्या शनिवारी आणि रविवारी (१० फेब्रुवारी- ११ फेब्रुवारी) ला ढगाळ वातावरण राहून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली या भागात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार (०९ फेब्रुवारी, १० फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी) पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पुण्यातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. पुढील चार ते पाच दिवसांत पुण्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor