शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सांगली , बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (11:40 IST)

शिवसेनेच्या कार्यालयात पोहचले चंद्रकांत पाटील!

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी चक्क इस्लामपूर शिवसेना कार्यालयाला भेट देवून जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या.

सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना कार्यालयाला अचानकपणे भेट दिली. यावेळी शिवसेनेचे आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन विरोधी पक्षातील नेते एकमेकांना भेटले. याचबरोबर बंद खोलीत या दोघांच्या चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

इस्लामपूरात स्थानिक पातळीवर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेने या ठिकाणी निवडणूक लढविली होती. गौरव नायकवडी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार इस्लापूर नगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक आहेत. राज्यात राष्ट्रवादी -शिवसेना सत्तेत असल्यामुळे सांगली जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकत्र आले आहेत. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कार्यालयात भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.