सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 21 जून 2021 (18:25 IST)

चंद्रकांतदादांनी घेतली फडणवीसांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी लेटरबॉम्ब टाकला. त्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीगाठी सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पाटील यांनी अचानक फडणवीसांची भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
 
चंद्रकांत पाटील आज मुंबईतच होते. आज पहाटे त्यांनी भाजप नेत्यांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या छोटेखानी कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर पक्ष कार्यालयात त्यांनी राज पुरोहित यांना भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचं पत्रं दिलं. त्यानंतर त्यांचा पालघरचा दौरा होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. चंद्रकांतदादा अचानक सागर निवासस्थानी आल्याने मीडियाचीही एकच धावाधाव उडाली. या बैठकीला केवळ चंद्रकांत पाटील आणि फडणवीसच उपस्थित होते. या दोन्ही नेत्यां व्यतिरिक्त तिसरा नेता या बैठकीला उपस्थित नव्हता. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड बैठक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीत नक्की काय रणनीती ठरली याबाबतचं कुतुहूल वाढलं आहे. मात्र, ही भेट कशासाठी होती? अचानक भेट घेण्याचं कारण काय? याचा तपशील गुलदस्त्यात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुमारे तासाभराच्या चर्चेनंतर चंद्रकांतदादा पालघरकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येतं.
 
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनीही युतीचे संकेत देत शिवसेनेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि फडणवीस यांच्या दरम्यान या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. शिवसेनेशी युती करण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाची काय मानसिकता आहे, यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. त्याशिवाय प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली. तसेच उद्या पवारांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 
या बैठकीत येत्या २६ जून रोजी होणाऱ्या भाजपच्या चक्काजाम आंदोलनावरही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. चक्काजाम आंदोलनाची तयारीवर या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे २६ जून रोजी राज्यात ओबीसींचं मोठं आंदोलन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.