सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (09:28 IST)

कामाबद्दल छगन भुजबळांची नाराजी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर, विधिमंडळात पडसादाची शक्यता

chagan bhujbal
सगळेच मराठा कुणबी होत असल्याने महाराष्ट्रात आता मराठा शिल्लकच राहणार नाही त्यामुळे मराठा आरक्षणासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकताच राहणार नाही, असे उपरोधिक वक्तव्य करताना अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी आज आपली नाराजी व्यक्त केली. दादागिरीने कुणबी प्रमाणपत्र घेतले जात आहेत, जात पडताळणीतही हेच होईल, ओबीसी आयोगही आता ओबीसी आयोग नाही तर मराठा आयोग झाला आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी आपला रोष व्यक्त केला. भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून विधिमंडळात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
 
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुरू असलेली मोहीम व न्या. शिंदे समितीबद्दल आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. विधिमंडळात ओबीसींच्या मुद्यांवर चर्चा होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ यांनी, आता अशा चर्चेची आवश्यकताच राहिलेली नाही. कारण सर्व मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. यामुळे मराठा आता महाराष्ट्रमध्ये शिल्लक राहणार नाही. सर्व कुणबीच होणार आहेत, असे उत्तर दिले. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत विचारता, त्याची काही आवश्यकता राहिलेली नाही. क्युरेटिव्ह पिटीशन करा किंवा नवीन बिल आणा जर सर्व मराठा कुणबी म्हणून ओबीसीमध्ये येत आहेत तर बाहेर कोण राहणार आहे? असा उपरोधिक सवाल भुजबळ यांनी केला. आता दादागिरीने कुणबी सर्टिफिकेट घेतली जात आहेत. पुढे जात पडताळणीच्या वेळेलाही असेच होणार आहे. न्या. शिंदे गावोगावी फिरून सर्टिफिकेट द्या, असं सांगत आहेत. आता काही शिल्लक राहिलेले नाही, सर्व कुणबी झाले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व लोक राजीनामा देत आहेत तो आयोग आता ओबीसीचा राहिलेला नाही. तो मराठा आयोग झालेला आहे, असा रोष ही भुजबळ यांनी व्यक्त केला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor