शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (19:11 IST)

रामायण महाकाव्य पोहोचणार जगात महाराष्ट्रात ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे’ आयोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामायण महाकाव्याने जगाला मुल्य व नवी दिशा दिली. हाच विचार जगभर पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळ्यात’ केली. या महोत्सवासाठी त्यांनी देश -विदेशातील पर्यटकांना निमंत्रणही दिले.
 
 
हरियाणातील फरीदाबाद येथे आयेाजित 33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटन मंत्री रामबिलास शर्मा, भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन्ट्रोन गोंगस्कडी यावेळी उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, ‘रामायण’ हे महाकाव्य जगातील सर्वच लोकांना मार्गदर्शक आहे. वेगवेगळ्या देशातही रामायणाचे सादरीकरण होते. मुख्यत: फिलिपायीन, कंबोडीया, थायलंड या देशातील कलाकारांनी त्यांच्या देशात सादर होणारे ‘रामायण’ या महोत्सवात सादर करावे तसेच भारतातील रामायणाचे सादरीकरण जगभर पोहचावे या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. २५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुंबई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
 
 
मुख्यमंत्री म्हणाले, हरियाणा आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट असून हे ‘माती व रक्ताचे’ नाते आहे. हरियाणाच्या मातीत महाराष्ट्रातील सैन्यानी देश रक्षणासाठी पानिपत युध्दात आपले रक्त सांडले. हा गौरवपूर्ण इतिहास जगापुढे घेऊन जाण्यासाठी हरियाणा सरकारने पुढाकार घेतला आहे. हरियाणा सरकारने पानिपत युध्द स्मारक विकासासाठी सुरु केलेल्या कार्यायाला महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 
 
 
पर्यटन हा संपूर्ण देशाला एका सुत्रात जोडणारा धागा असून उत्पन्नाचेही उत्तम साधन आहे. सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून देशातील हस्तकलाकारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. हा मेळा देश-विदेशातील पर्यटकांचेही मोठे आकर्षण आहे. या मेळ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी पानिपत येथील युध्द स्मारकालाही भेट द्यावी अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. या मेळयात महाराष्ट्राला थीम स्टेटचा मान दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच या मेळ्यात सहभागी झालेल्या देश-विदेशातील सर्व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.आज सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प देशातील गरीब, सामान्य माणूस, शेतकरी, मध्यमवर्गीय व महिलांसाठी मोठी भेट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.