1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 मे 2023 (08:28 IST)

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde
मुंबई,– स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या  १४० व्या जयंतीनिमित्त राज्यात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन‘ साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना‘ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सावरकर स्मारक चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड निर्मित हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सादर करण्यात आला.
 
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही गौरवास्पद बाब आहे.
 
 मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीरांचे श्रेष्ठत्व, त्याग, बलिदान, देशभक्ती ही सर्वश्रुत आहे. या देशाचे, राज्याचे व मातीचे सुदैव स्वा. सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक येथे जन्माला आले. प्रखर देशभक्तीमुळे त्यांची इंग्रजांमध्ये दहशत होती. संपूर्ण सावरकर समजून घेणं अशक्य व अवघड आहे, परंतु त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला नक्कीच येईल. स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, महान क्रांतिकारक, सक्रिय समाजसुधारक अशा विविधांगाने त्यांची ओळख होती. ते प्रतिभावंत साहित्यिक, कवी होते तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी इंग्रजीला त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले, असे म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले.

Edited  By - Ratnadeep Ranshoor