गुरूवार, 4 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 3 सप्टेंबर 2025 (17:44 IST)

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवना’साठी पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

विशेष पुढाकार घेऊन महाराष्ट्र भवनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल लंडन मधील मराठीजनांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

Maharashtra Mandal London
लंडनमधील मराठीजनांना स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. महाराष्ट्र मंडळ, लंडन या संस्थेला ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे सुपूर्द करण्यात आला.
 
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.
महाराष्ट्र मंडळ, लंडनच्यावतीने ट्रस्टी वैभव खांडगे यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच विशेष प्रयत्न करून हा निधी मंजूर करून देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. लंडनमधील मराठी बांधवांसाठी स्वतःचे सांस्कृतिक भवन असावे, ही आमची दीर्घकाळची मागणी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे आज हा ऐतिहासिक क्षण साकारला आहे असे वैभव खांडगे म्हणाले. 
महाराष्ट्र मंडळ, लंडन ही भारताबाहेरील सर्वात जुनी मराठी संस्था असून तिची स्थापना 1932 मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी केली होती. स्थापनेपासून भाडेतत्त्वावर कार्यरत असलेल्या या संस्थेला अखेर स्वतःचे भवन मिळणार आहे. ‘महाराष्ट्र भवन’ हे लंडनमधील मराठी बांधवांसाठी केवळ सांस्कृतिक केंद्रच ठरणार नसून महाराष्ट्र शासन व युनायटेड किंगडम यांच्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करणारे व्यासपीठ ठरणार आहे.