सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (23:07 IST)

'एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते', आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, तो जाऊदे तो...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडापूर्वी काही दिवस आधी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आले होते. तिथे ते येऊन रडले होते, असा दावा शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया टाळलं असलं तरी आदित्य यांच्या वक्तव्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
 
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं ते आपल्याला पाहावं लागेल.
 
आदित्य ठाकरे हे विशाखापट्टणम येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते.
 
येथे एका प्रश्नाचं उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "सध्याचे मुख्यमंत्री हे बंडापूर्वी काही दिवस आमच्या घरी (मातोश्री) आले होते. केंद्रीय तपास संस्था आता मला अटक करणार आहेत, असं म्हणत ते रडले होते.
 
"मला भाजपसोबत जावं लागेल, अन्यथा ते मला अटक करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती," असंही ठाकरे म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या दाव्याबाबत उलटसुलट चर्चा रंगलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.
 
आदित्य केलेल्या वक्तव्यावर स्पष्ट उत्तर देणं टाळून मुख्यमंत्री म्हणाले, "ते जाऊदे, तो लहान आहे."
 
संजय राऊतांचाही दावा
यानंतर संजय राऊत यांनीही अशाच प्रकारचा दावा केला.
 
यासंदर्भात टीव्ही 9 भारतवर्षच्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देत राऊत यांनी म्हटलं, "हे 100 टक्के खरं आहे. एकनाथ शिंदे माझ्याकडेही येऊन असं म्हणाले होते."
 
"मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मनात आणि डोक्यात तुरुंगाची भीती स्पष्टपणे दिसत होती. आदित्य खरं बोलत आहेत," असं संजय राऊत म्हणाले.
 
शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं तरीसुद्धा शिवसेनेच्या इतर नेत्यांसह भाजपचे काही नेते या वादात उतरले आहेत.
 
शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरेंची तुम्ही एक मुलाखत पाहा, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की 'मी एकनाथ शिंदे यांना बोलावलं होतं, त्यांना सांगितलं की तुम्हाला हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी मुख्यमंत्रिपद सोडतो, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे स्वतः उद्धव ठाकरे बोलले आहेत."
 
पण आदित्य ठाकरे यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग सुरू आहे, त्यांनी त्यासाठी एक एजन्सी नेमलेली आहे. ते आता असं बोलत आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्यांना आदर नाही, असा त्याचा अर्थ होतो."
 
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, "नऊ महिन्यांपासून ते म्हणतात की यांनी बंड केलं, बंड केलं. हो आम्ही बंड केलं, लग्नानंतर नऊ महिन्यांनी अपत्यही होतं. बंड-उठाव होऊन गेला. त्या गोष्टीला आता नऊ महिने झाले. आता राज्याचं काही बघणार की नाही. एखाद्या घरात तरुणाचा मृत्यू झाला तरी माणूस 10 दिवसांत विसरून जातो. तुम्ही आम्हाला विसरा ना आता, लोकांना का इतके छळत आहात?
 
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रकरणी ट्विट करत म्हटलं, "राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अश्रू पुसणारे आहेत. घरातला मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे नाहीत. पप्पू परदेशात जाऊन देशाची आणि पंतप्रधानांची बदनामी करतो तर पेंग्विन परराज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांची बदनामी करतोय. दोघेही एकही थाली के चट्टे-बट्टे आहेत."
 
भाजप नेत्यांची टीका
आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर केवळ शिवसेना नेत्यांनीच टीका केली नाही. तर भाजपमधूनही त्यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात आल्याचं दिसलं.
 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यासंदर्भात म्हणाले, "यावर मी अजिबात उत्तर देणार नाही. आदित्य ठाकरे कोण आहे? त्याला काय प्रतिष्ठा आहे. तो बालिश आहे. तुम्ही आता शाळेतल्या मुलांचेही प्रश्न विचारणार का?"
Published By -Smita Joshi