शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (18:05 IST)

वर्धा-अमरावतीमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

heavy rain
विदर्भातील वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे.
 
वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तर मुसळधार पावसामुळेअमरावतीतील 20 गावांचा संपर्क तुटला आहे.
 
वर्ध्यात ढगफुटी?
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे 700 घरांमध्ये पाणी शिरले आहे.
 
जिल्हा प्रशासनकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात भाकरा नाल्याचा प्रकोप अनुभवायला मिळाला आहे.
 
हिंगणघाट शहरालगत वणा नदी तसेच भाकरा नाल्याला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी पातळी वाढल्याने भाकरा नाल्याजवळ असलेल्या नगरांमध्ये मध्यरात्री पासून शेकडो नागरिक अडकले होते.
 
या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम पोहचली आहे. पहाटे चार वाजतापासून नागरिक सुटकेच्या प्रतीक्षेत होते.
 
एसडीआरएफची टीम दाखल झाल्याने बचाव कार्यात वाढ झाली आहे. आतापर्यत दीडशे नागरिकांना रेस्क्यू करीत सुखरूप सुरक्षा स्थळी पोहचवण्यात या टीमला यश आले आहे.
 
अप्पर वर्धाच्या पुलावरून पाणी जात असल्याने मोर्शी व आष्टीची वाहतूक सकाळ पासून बंद ठेवण्यात आली आहे.
 
अमरावतीत अनेक गावांशी संपर्क तुटला
कालपासून (17 जुलै) अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील धारणी मुख्यालयापासून 20 गावं संपर्काबाहेर आहेत.
 
दिघी महल्ले, गोकुळसरा, सोनोरा काकडे बोरगाव निस्ताने, आष्टा या गावांचा संपर्क तुटला आहे. निंबोली, भातकुली गावांतील काही घरात पाणी शिरले आहे.
 
आष्टा गावाला पाण्यानं चोहीकडून विळखा घातला आहे.
 
मेळघाटातही धो धो पाऊस पडत असल्यानं येथील 20 गावचा संपर्क तुटला आहे. दिया गावालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहत असून सिपना नदीला महापूर आला आहे.
 
पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी मेळघाट प्रशासनानं अलर्ट जारी केला आहे. पोलिसांची तुकडीही घटनास्थळी दाखल झाली आहे. येथेही मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.
 
पावसामुळे नागपूर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
 
गडचिरोलीतही धुवांधार पाऊस
गडचिरोलीत शिवणी नाल्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद करण्यात आला होता.
 
पण, कुंभी मोकासा येथील आनंदराव मेश्राम या डायलोसिसच्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात भरती करण्याची गरज भासली.
 
तालुका प्रशासनाने आरोग्य विभागाला संपर्क केल्यानंतर आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला व सदर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी बचाव पथक पाठवण्याचा निर्णय घेतला.
 
गडचिरोलीच्या चामोर्शी मार्गावर शिवणी ते चामोर्शी मार्ग बंद असल्याने व गुरुवाळा मार्गही नाल्यावरून पाणी वाहत असल्याने बंद होता.