गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जुलै 2022 (15:11 IST)

कोल्हापूर :खासदार मंडलिक, माने शिंदे गटात दाखल होण्याची चिन्हे

eknath shinde
कोल्हापूर  जिल्हय़ाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खासदार संजय मंडलिक यांनी राज्याच्या राजकारणात शिंदे गटाला बळ द्यावे. पुढील राजकीय वाटचालीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी हमीदवाडा येथील मेळाव्यात मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खासदार मंडलिक शिंदे गटासोबत जाण्याचे संकेत असून त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान खासदार धैर्यशील माने नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. चार दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृहात खासदार मंडलिक यांनीच शिवसेनेत राहिलेत ते अस्सल सोनं, तर शिंदे गटात गेलेल्यांना बेन्टेक्स म्हंटले होते. त्यामुळे राहिलेले अस्सल सोने देखील बेन्टेक्स होणार अशी चर्चा कालदिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात होती.
 
मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा रविवारी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हमीदवाडा येथे मेळावा झाला. मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी खासदार मंडलिक यांनी शिंदे गटासोबत जावे, अशी सर्वानुमते मागणी केली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर कोरोना महामारी आणि महापुराच्या कारणाने खासदारांचा निधी गोठवल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला विकासकामे दाखवावी लागणार आहेत. राज्यात शिंदे यांचे सरकार तर केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावांचा विकास साधण्यासाठी खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जावे, असा सूर बहुतांश प्रमुख कार्यकर्त्यांनी मेळाव्यामध्ये धरला.