सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (11:32 IST)

आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून सुटका

क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची आज अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. आर्यन 29 दिवस अटकेत तर 24 दिवस आर्थर रोड तुरुंगात होता. 2 ते 7 ऑक्टोबरपर्यंत तो एनसीबी कस्टडीत होता
 
जामीनासाठीची कोर्टाची ऑर्डर निघून त्यासाठीची सगळी प्रक्रिया काल (29 ऑक्टोबर) पूर्ण झाल्यानंतर आता आज आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली.
आज पहाटे साडेपाच वाजता आर्थर रोड जेलच्या 'Bail Box' मधून पोलीस अधिकाऱ्यांनी जामीनासाठीच्या ऑर्डर्स ताब्यात घेतल्या. जामीन मिळवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याच बॉक्समध्ये कागदपत्रं टाकायची असतात. आर्यनच्या जामीनाची कागदपत्रंही या बॉक्समध्येच टाकण्यात आली होती.
जामीन मिळण्यासाठीची सेशन्स कोर्टातली प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागल्याने काल आर्यनला तुरुंगाबाहेर पडता आलं नव्हतं.
 
तुरुंग अधिक्षकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत आर्यन खानच्या जामीनाचा आदेश आला नाही. त्यामुळे त्याला आज सोडणार नाही. जे सगळ्यांसाठी नियम, तेच आर्यन खानसाठी लागू असतील."
 
ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला एनसीबीनं अटक केली होती. त्यानंतर त्याला गेल्या 23 दिवसांपासून मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलंय.
28 ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला. पण जामीन मिळूनही आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सुटका होऊ शकली नाही.
 
जामीनाचा आदेश आर्थर रोड जेल प्रशासनापर्यंत पोहोचला नसल्यानं आर्यन खानची कालची रात्रही तुरुंगातच गेली.
 
अभिनेत्री जुही चावलाने आर्यनच्या जामीनासाठीच्या प्रक्रिया शुक्रवारी संध्याकाळी पूर्ण केल्या. पण त्या व्हायला उशीर झाल्याने तुरुंग प्रशासनापर्यंत कागदपत्रं पोहोचण्याची संध्याकाळी साडेपाचची वेळ टळून गेली.
 
जामीन मिळूनही आर्यन खानची सुटका का नाही ?
क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर झाला.
 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केल्यानंतर 25 दिवसांनी आर्यनला जामीन मिळालाय. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "आर्यन खानसह इतर तीन आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केलाय."
 
हायकोर्टाने 28 ऑक्टोबरला आर्यनला जामीन मंजूर केला. पण, जामिनाचा आदेश आणि अटींबाबत शुक्रवारी (29 ऑक्टोबर) सविस्तर निकाल देणार असल्याचं न्यायमूर्ती व्ही. सांबरे यांनी सांगितलं. त्यामुळे आर्यन खानला गुरूवारची रात्र तुरुंगात काढावी लागली होती.
 
दुसरीकडे, आर्थर रोड जेलमधील बेलबॉक्स (कागजपत्रांचा बॉक्स) दिवसातून दोन वेळा उघडण्यात येतो आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत जामिनाच्या आदेशाची प्रत मिळाल्यासच कैद्याला सोडण्यात येतं.
 
आज (29 ऑक्टोबर) 5.30 वाजेपर्यंत आर्यनच्या जामिनाचा आदेश तुरुंग प्रशासनाला मिळाला नाही. त्यामुळे आजची (29 ऑक्टोबर) रात्रही तुरुंगातच जाणार आहे.
 
जामीन मिळाल्यानंतर आर्यन जेलमधून केव्हा बाहेर येणार? याबाबत बोलताना आर्यनचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले होते, "आर्यन खानची शुक्रवारी किंवा शनिवारी जेलमधून सुटका होऊ शकेल."
 
जामिनाच्या अटी-शर्थीं कोणत्या?
 
आर्यन खानला जामीन देताना कोर्टाने खालील अटी ठेवल्या आहेत -
 
प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर.
या प्रकरणातील इतर आरोपींशी संपर्क ठेवता येणार नाही.
असा गुन्हा परत करू नये.
साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार नाही.
देश सोडता येणार नाही, पासपोर्ट कोर्टात सादर करावा.
या प्रकरणाबाबत मीडिया, सोशल मीडियावर कोणतंही वक्तव्य करू नये.
दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत NCB कार्यालयात उपस्थित राहावे.
कोर्टाच्या सर्व सुनावणीला उपस्थित राहावे.
खटला सुरू झाल्यानंतर खटला प्रलंबित करण्याचा प्रयत्न करू नये.
न्यायालयाची ही ऑर्डर निघाल्यानंतर आता ती NDPS कोर्टात जमा करण्यात येईल, त्यानंतर ती जेलला जाऊन मग आर्यनची सुटका होईल, अशी माहिती मिळाली आहे.
 
न्यायालयात काय घडलं?
28 ऑक्टोबर दुपारी एकच्या सुमारास आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली.
 
सुरुवातीच्या युक्तिवादादरम्यान, कोर्टाने NCB ACG यांना विचारलं की आर्यनवर सेक्शन 28,29 कशाच्या आधारावर लावला?
 
व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कमर्शियल व्यवहार केल्याचं दिसल्याने हे कलम लावल्याचं उत्तर ASG यांनी दिलं.
 
यावेळी आर्यन खान नियमितपणे डृग्ज घेतो. डृग्जचा पुरवठा करतो याचे ठोस पुरावे आहेत, असा दावा NCB चे वकील अतिरिक्त सॅालीसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.
तसंच, आरोपींकडून विविध डृग्ज जप्त करण्यात आले. आरोपींना डृग्ज असल्याची माहिती होती आणि ते ड्रग्जचं सेवन करणार होते. आम्ही ड्रग्जच्या पझेशनबाबत बोलत आहोत. आर्यन खानला ड्रग्ज सोबत असल्याची माहितीही होती, असं NCB च्या वकिलांनी म्हटलं.
 
याला उत्तर देताना युक्तिवादात आर्यन खानचे वकील म्हणाले, "आर्यन खानकडून कोणतीही रकिव्हरी झालेली नाही. कमर्शियल क्वांटिटी आणि आणि कॉन्स्पिरसी यांच्याशी आम्ही एकाचवेळी आम्ही डिल करत आहोत. इतर पाच लोक काय कॅरी करतात ती आर्यनची जबाबदारी कशी काय?
 
ते पुढे म्हणाले, 1300 लोक त्या शीपवर होते, कॉन्स्पिरसी होती हे सांगताना पुरावे हवेत. ताज हॉटेलमध्ये 500 खोल्या आहेत. एका खोलीत ड्रग घेतले जात असतील तर हॉटेलमधील सगळ्यांना ताब्यात घेणार का? मग कॉन्स्पिरसी आहे हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावा काय, असा प्रश्न आर्यनच्या वकिलांनी विचारला.
 
कट रचण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागतं. अरबाझ सोडला तर आर्यन इतर कोणालाही ओळखत नाही. सेक्शन 29 कॉन्स्पिरसीसाठी लावलं ते इथे लागू होत नाही, असं आर्यन खानचे वकील म्हणाले.