मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (15:08 IST)

संजय राऊतांमुळे मुख्यमंत्री अडचणीत येणार- विखे पाटील

उठसूठ रोज भाजप नेत्यांना लक्ष करुन आरोप करण्यापेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील अडीच वर्षात आघाडी सरकारने राज्यासाठी काय दिवे लावले, हे एकदा तरी सांगितले पाहिजे. यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने मुख्यमंत्री अडचणीत येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. वेगवेगळी वक्‍तव्य करणारे राऊत आघाडीमध्येही एकटे पडल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांना आता सेनाभवनाचा आधार घ्यावा लागल्याचा टोला लगावून वाईन कंपनीत असलेली त्यांची भागीदारी राज्यासमोर आली.
 
पत्राचाळीच्या आर्थिक गैरव्यवहारात त्यांच्या निकटवर्तीयांवर झालेली कारवाई राजकीय हेतूने असल्याचे दाखविण्यासाठी रोज माध्यमांसमोर येवून राऊत आगपाखड करीत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.
 
भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या राऊतांना कोणीही आता गांभिर्याने घेत नाही. आर्थिक गैरव्यवहारावरून निकटवर्तीयांवर झालेल्या कारवाईमुळेच त्यांची आगपाखड सुरू आहे. खोट बोल पण रेटून बोल स्वभावामुळेच त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढत चालल्या असल्याचे आमदार विखे पाटील म्हणाले. सत्तेत राहुन काँग्रेसला कोणी विचारत नाही. सत्तेसाठी एखाद्या पक्षाने किती लाचारी पत्करावी याचे आश्‍चर्य वाटते. दोन चार मंत्रीपद मिळाली म्हणून पक्षाने सर्व तत्वांशीच तडजोड केली.एकीकडे उत्तरप्रदेशच्या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घ्यायची, राज्यात शिवसेनेबरोबर मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचे. काँग्रेसचा राजकीय प्रवास कोणत्या दिशेला चाललाय याचे तरी भान पक्षाच्या नेत्यांना राहीले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.