भंडारा आयुध कारखान्यातअपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील आयुध कारखान्यात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. आणि 5 जण जखमी झाले. या अपघाताची चौकशी करण्यासाठी उपकामगार आयुक्त (केंद्रीय) नागपुर यांची चौकशी समिती सोमवार पासून चौकशी सुरु करणार आहे.
भंडारा येथे जवाहर नगर भागातील आयुध कारखान्यात एचईएक्स उपविभागातील एका इमारतीत क्रमांक 23 मध्ये शुक्रवारी सकाळी 10:40 च्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज 8 किमी दूरपर्यंत ऐकू आला आणि 12 किमी अंतरापर्यंत कंपने जाणवली. इमारतीचे लोखंडी आणि काँक्रीटचे अवशेष दूरवर पसरले होते. जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथील लक्ष्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाच्या वेळी युनिटमध्ये 13 लोक काम करत होते. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.या मध्ये 8 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून 27 जानेवारी पासून ही समिती काम सुरु करणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात आयुध कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या मागील कारणांचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. यानंतर भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
Edited By - Priya Dixit