गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 मे 2021 (16:07 IST)

विहीर हरवली, अनाड गावाच्या शेतकर्‍यानं केली हैराण करणारी तक्रार

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठ्यामध्ये अनाड गावातील एका शेतकर्‍याने विहीर हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. तलाठ्यांनी स्वतः शेतात विहीर असल्याची नोंद सातबाऱ्यावर केली. मात्र आता माझी विहीरच हरवली आहे, अशी तक्रार शेतकरी भावराव गदाई यांनी केली आहे. 
 
त्यांनी म्हटलं की या विहिरीत पाच परस पाणी होतं. त्या पाण्यावर मिरचीचं पिक मी घेणार होतो त्यामुळं मोठं संकट कोसळलं आहे. आता माझी विहीर शोधून द्यावी असे त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. 
 
काय आहे खरी परिस्थिती-
शेतकरी भावराव गदाई यांची गदाई शिवारामध्ये शेती असून पाण्याचा स्त्रोत अत्यंत गरजेचा असल्यामुळे त्यांनी शेतात विहीर घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज केले पण वारंवार नाकारले गेले. विहिर नसूनही सातबाऱ्यावर विहिर असल्याची नोंदही तलाठ्यांनी केली असल्यामुळं त्यांचा विहिरीचा अर्ज मंजूर होत नव्हता. 
 
ही नोंद दुरुस्त करण्यासाठी अनेकदा अर्ज करुन फायदा झाला नाही. तेव्हा अखेर गदाई यांनी हा मार्ग शोधला आणि विहीर हरवली अशी तक्रार केली तेव्हा या प्रकरणाकडे लक्ष देण्यात आलं. आता त्यांना चुकून विहीर असल्याची नोंद झाल्याची चूक दुरुस्त करण्यासाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून दोन दिवसांत त्यावर कारवाई होईल असं सांगण्यात आलं.

फोटो: सांकेतिक