शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (20:47 IST)

पाठीत सुरा खुपसण्याची सवय काँग्रेसला नाही; सरकार टिकावं हीच आमची भूमिका- नाना पटोले

"अमित शाहांसोबतही काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस तर छोटे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्हाला आता शरद पवारांच्या भेटींची सवय झाली आहे," असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर टिप्पणी केली.
 
बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी नाना पटोले यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार भेटीव्यतिरिक्त नाणार प्रकल्प तसंच मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलची काँग्रेसची भूमिका यावरही भाष्य केलं.
 
भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशा चर्चा नेहमी सुरू असतात. अशावेळी हे सरकार पाच वर्षं टिकेल याची तुम्हाला खात्री आहे का?
 
काँग्रेस पक्षाला पाठीमध्ये सुरा खुपसण्याची सवय नाही. त्यामुळे सरकार पाच वर्षं टिकावं हीच आमची भूमिका आहे. लोककल्याणाचं काम व्हावं, कॉमन मिनिमम प्रोग्राम चालावा ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही जे लढू ते समोरून लढू. पाठीमागे सुरा खुपसायची सवय आम्हाला नसल्याने सरकार टिकवायचं की नाही हे त्यांच्या हातात आहे.
 
सरकार पाच वर्षं चालेल ही आमची भूमिका आहे. पण कोणाला ते चालवायचंच नसेल, दुसरीकडे राहायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. कोणाला जबरदस्ती धरून-बांधून आणून तर आम्ही सरकार बनवलं नाही. या सरकारचे निर्माते कोण आहे, हे सगळ्यांनाच माहितीये. त्यामुळे इकडे-तिकडे काही होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.
 
नाणार प्रकल्पाबद्दल काँग्रेसची भूमिका...
 
नाणार हा प्रकल्प कोकणासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याबद्दल तिथल्या लोकांनी माझ्यासमोर भूमिका मांडली. प्रकल्प येण्याच्या आधीच गुजरातच्या उद्योगपतींनी शेतकऱ्यांची जमीनही घेऊन टाकली, अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या.
 
तिथला मच्छिमार असो, शेतकरी असो किंवा बेरोजगार असोत या कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. नाणारसारख्या प्रकल्पांमुळे त्या भागात रोजगाराची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि कोकणातील लोकांना मुंबईत येऊन काम करण्याऐवजी त्यांच्या गावातच काम मिळत असेल तर लोकभावना लक्षात घेऊन प्रकल्प करणं आमची जबाबदारी आहे.
 
नाणारबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
 
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. अशापरिस्थितीत तुमचं त्यांच्यासोबत 'अंडरस्टँडिंग' असेल की त्यांच्या विरोधातही काँग्रेस उमेदवार उभे करणार?
 
स्वबळावर उभं राहण्याचा आमचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जागेवर आमचे उमेदवार उभे राहतीलच. 'अंडरस्टँडिंग' हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाहीये. जे करायचं ते समोरून करायचं, मागून वार करायची सवय आमची नाही. त्यामुळे आमची कोणतीही 'अंडरस्टँडिंग' नसेल. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू, सगळ्या जागा लढवू.