सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 14 मे 2022 (08:39 IST)

काँग्रेसने अनेकदा...जयंत पाटील यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर पलटवार

Jayant Patil
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करीत भाजपा बरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा, राष्ट्रवादीला फसवलं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. मिरज मेडिकल कॉलेजच्या पदवीदान सभारंभानंतर पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

भंडारा गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं होतं. यावेळी नाना पटोले म्हणत होते की, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. जयंत पाटील व प्रफुल पटेल, यांच्यासोबत सुध्दा बोलणं झाल्यावर सुद्धा यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपा सोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सुध्दा राष्ट्रवादी भाजप सोबत जात युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता जंयत पाटील यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
स्थानिक काँग्रेसच्या वागणुकीबाबत दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर या सर्व गोष्टी घालण्यात आले आहेत, मात्र यात कोणताही बदल स्थानिक पातळीवर झाला नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, भाजपा बरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा, राष्ट्रवादीला फसवलं आहे असा आरोपही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. राज ठाकरे हे नेहमी भूमिका बदलत असतात. राज ठाकरे नकला चांगल्या पद्धतीच्या करतात त्यामुळे त्यांच्या सभेला गर्दी होत असते. पण लोक गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे, राज ठाकरे यांनी देखील आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोलाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.