शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (09:11 IST)

काँग्रेसचे प्रदेश अधिवेशन फैजपूरला

congress
जळगाव जिल्ह्यात निष्क्रिय झालेल्या पक्षाला उभारणी देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अधिवेशन फेजपूरला घेण्याचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विचार असून, त्यांनी आपणास याबाबत पूर्व तयारीच्या सूचना दिल्या आहेत. पक्षात निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. काम न करणाऱ्यांना आपली पदे सोडावी लागणार असल्याची माहिती काँग्रेसचे जळगाव जिल्हयाचे प्रभारी विनायकराव देशमुख यांनी दिली.
 
1936 मध्ये जिल्ह्यातील फैजपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. पक्षाचे ते पहिले ग्रामीण अधिवेशन होते. म. गांधी पासून पंडित नेहरू, डॉ राजेंद्र प्रसाद ते वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत राष्ट्रीय नेत्यांनी या फैजपूरला हजेरी लावली होती. स्वातंत्र्यानंतर जळगाव जिल्हा हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आणिबाणीनंतर देखील जनता पक्षाच्या राजवटीत जळगावच्या लोकसभेच्या जागा या काँग्रेसनेच जिंकल्या होत्या. प्रतिभाताई पाटील, मधुकरराव चौधरींसारखे नेते या जिल्हयाने राज्याला दिले होते. नंतर मात्र जिल्हयात पक्षाला ओहोटी लागली. आज जिल्ह्यात काँग्रेस मृतप्राय झालेली आहे.
 
पक्षात कार्यकर्ते कमी आणि गटबाजीत अडकलेले नेते असे चित्र असून, याचा फटका पक्षाला बसला आहे. याबाबत विचारता विनायकराव देशमुख यांनी चिंता व्यक्त करत ही बाब प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत गंभीरपणे घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये परत नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यंदा फैजपूरला प्रदेश अधिवेशन घेणार आहेत. याबाबत त्यांनी फैजपूर येथे त्यांच्या दौऱ्यात तसे सांगितले होते. आता आपल्याला प्रदेश अधिवेशन घेण्याबाबत पूर्वतयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.