गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (08:19 IST)

पंकजा मुंडे: 'मी जनतेच्या मनात असेन तर मोदीजीही मला संपवू शकणार नाहीत'

pankaja munde
"मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत," असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील, अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील "संवाद बुद्धिवंतांशी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.
 
"मी जनतेच्या मनात असेल तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत. काँग्रेसमध्ये वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वंशवाद संपवत आहेत," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
 
परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी वंशवाद संपवत आहेत. हे सांगताना पंकजा मुंडे थोड्या थांबल्या आणि म्हणाल्या मी देखील वंशवादाचं प्रतीक आहे.
 
"पण मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही. जर जनतेच्या मनात मी असेल तर मोदीजी देखील माझं राजकारण संपवू शकत नाहीत," असं पंकजा मुंडे पुढं बोलताना म्हणाल्या.
 
पंकजा मुंडे म्हणाल्या, "राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. परंतु, अलीकडे राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे. हे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षित नाही."
 
दरम्यान, आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे देखील त्यांनी याआधी म्हटले होते. त्यावेळीपासून त्यांना नेतृत्वाकडून डावलण्यात येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
 
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पंकजा मुंडेंचं नाव या निवडणुकीसाठी चर्चेत होतं. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. पण, ऐनवेळी पंकजांचं नाव वगळून पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका उमा खापरे यांना संधी देण्यात आली.
 
नुकत्याच जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं पंकजा मुंडेंना संधी न दिल्यानं मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे दिसलं होतं. प्रत्यक्ष निदर्शनं असोत किंवा सोशल मीडियावरील प्रतिक्रिया असोत, यातून मुंडे समर्थकांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती.
 
पंकजा मुंडे यांच्या नावासाठी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला होता, असं स्वत: महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र, प्रत्यक्ष यादीत पंकजा मुंडेचं नाव नव्हतं.
 
पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलेलं नाही यावर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली होती.
 
"पंकजा मुंडेंना डावललं याचं मला अतिव दु:ख आहे. मुंडे-महाजन-खडसे-फुंडकर या नावानं काही कालखंड भाजपची ओळख होती. मुंडेसाहेब आमचे नेते होते. त्यांनी पक्षासाठी उभं आयुष्य खर्ची घातलं आणि त्यांच्या मुलीला, ज्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रभर आहे, त्यांना डावलण्याचं कारण मी समजू शकलो नाही," असं खडसे म्हणाले.
 
पंकजा मुंडेंबाबत बोलताना भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काही भविष्यातील विचार केला असेल."
 
उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा यांनी थेट भाष्य करणं टाळलं होतं.
 
2019 च्या निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पंकजांना राज्याच्या राजकारणात पक्षाकडून फारशी संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षावर त्या नाराज असल्याची चर्चा कायम सुरू असते.
 
राज्यातील भाजप नेत्यांविरोधातील नाराजी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट कधीच बोलून दाखवली नाही. पण, आपल्या भाषणातून अनेकवेळा त्यांची नाराजी दिसून आली आहे.
 
राज्याच्या राजकारणात फारशी जबाबदारी नसलेल्या पंकजा मुंडे सद्यस्थितीत भाजपच्या केंद्रीय सचिव आहेत. त्याचसोबत मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. पंकजा ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या जातीय समीकरणात त्यांना यावेळी संधी मिळेल चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.