कोरोना चाचण्यांच्या दरात प्रति तपासणीत ३०० रूपयांची कपात
राज्यात तिसऱ्यांदा कोरोना चाचण्यांच्या दरात कपात करण्यात आली असून यावेळी प्रति तपासणीत ३०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे जास्तीत जास्त दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यासाठी २५०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी आता वैयक्तिकरित्या तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारण्याचे आदेश खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.
मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम कीट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते.
असे आहेत नवे दर
आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टीग त्याकरीता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येतील. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये सुधारित दरानुसार आकारण्यात येणार आहेत.