‘कोव्हॅक्सिन’ लस चाचणीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीसाठी कोल्हापूरची निवड
कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस चाचणीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीसाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने (आयसीएमआर) कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची निवड केली आहे. शिवाय या चाचणीमध्ये कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होता येणार असून या चाचणीचा कार्यक्रम तातडीने सुरू करण्यात आला आहे.
कोव्हॅक्सिन या लस चाचणीचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसर्या आणि देशातील सर्वात मोठ्या टप्प्यालाही प्रारंभ झाला आहे. या टप्प्यामध्ये देशभरातील 25 हजार 500 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार असून यामध्ये गोव्यात क्रोम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम या संस्थेच्या वतीने देशातील एकमेव खासगी साईट कार्यरत आहे. या साईटवर एकूण 1 हजार स्वयंसेवकांना लस चाचणीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. यापैकी 250 स्वयंसेवकांना ही लस देण्यातही आली आहे. स्वयंसेवकांना लस देताना त्यांचा स्वॅब घेऊन तो आरटीपीसीआर यंत्राद्वारे तपासण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया यामध्ये अंतर्भूत आहे. हा स्वॅब तपासण्याकरिता प्रारंभी गोवा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु तेथे असलेल्या क्लोज्ड एंड स्वरूपाच्या यंत्रामध्ये इतर दुसर्या कोणत्याही कंपनीचे किटस् चालत नाहीत आणि कोव्हॅक्सिनच्या चाचणीमध्ये आयसीएमआरने विकसित केलेले किटस्च वापरणे आवश्यक होते. याप्रसंगी आयसीएमआरकडे निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, हैदराबाद व राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था, पुणे हे दोन पर्याय उपलब्ध होते. तथापि क्रोमने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मान्यता घेऊन कोल्हापूरच्या शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेची गुणवत्ता पटवून दिल्यानंतर आयसीएमआरने शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला हिरवा कंदील दाखवला आहे.