गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (21:34 IST)

कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या "इतक्या" वाहनचालकांवर कारवाई

Nashik Police
नाशिक नूतन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात कर्णकर्कश हॉर्न वाजवून वेगाने जाणारे वाहनचालक ठिकठिकाणचे टवाळखोर आणि इतर नियमभंग करणाऱ्यांकडून सुमारे 1 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
नाशिक शहरात गेल्या मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस ही मोहीम राबविण्यात आली. त्यात मंगळवारी कॉलेज रोड, आसाराम बापू ब्रिज, अशोका मार्ग, अंबड लिंक रोड, इंदिरानगर, वडाळा जॉगिंग ट्रॅक आदी भागांत मध्यवर्ती गुन्हे शाखा व शहर वाहतूक शाखा यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी मोठमोठ्याने कर्णकर्कश हॉर्न वाजविणारे वाहनचालक, टवाळखोर, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणारे रोडरोमिओ यांच्यावर कारवाई करण्यात आली.
 
परिमंडळ-1 हद्दीतील 68 टवाळखोरांवर बुधवारी कारवाई करण्यात आली, तसेच ट्रिपलसीट दुचाकीधारक, कागदपत्रे न बाळगणारे वाहनचालक, सायलेन्सर मॉडीफाईड केलेले वाहनधारक व भरधाव वेगाने जाणारे वाहनचालक अशा 158 वाहनधारकांवर कारवाई करून 81 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
 
तसेच परिमंडळ-2 च्या हद्दीतील 120 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली व विविध कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या 169 वाहनधारकांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण 170 टवाळखोरांवर कारवाई, तर 327 वाहनधारकांवर कारवाई करून 1 लाख 21 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
यापुढेही टवाळखोर, रोडरोमिओ व विविध कायद्यांचे उल्लंघन करणारे वाहनधारक यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.