गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , सोमवार, 22 मे 2017 (11:38 IST)

माणुसकीची एैसी की तैशी! महिलेची शेजार्‍याने काढली छेड!

कधी कधी माणुसकी दाखवणे महागात पडते. चुकीच्या व्यक्तीला केलेले सहकार्य आपल्याच मनस्तापाला कारणीभूत ठरते.
 
हर्सूलमधील महिलेला केलेल्या माणुसकीचा चांगला धडा बसला आहे. 
 
ती शेजारीण दवाखान्यात भरती असल्याने तिच्या घरी स्वयंपाक बनवून द्यायला गेली तर शेजारणीच्या पतीने तिची छेड काढली. तू मला फार आवडतेस असे म्हणून तिच्या अंगचटीला गेला. ही घटना काल घडली. 
 
पोलिस सूत्रांनी सांगितले, की दत्ता कौतिक निकम (३५) असे आरोपीचे नाव आहे. 
 
३१ वर्षीय महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दिली की, दत्ताची बायको मूतखड्याच्या आजाराने त्रस्त असल्याने दवाखान्यात अ‍ॅडमिट होती. म्हणून ही दत्ताच्या घरी स्वयंपाक बनवून द्यायला गेली होती. 
 
स्वयंपाक बनवून देऊन, दत्ताच्या मुलीसोबत काही काळ राहून ती तिच्यासोबत वामकुक्षी घेत असताना दत्ता तिच्याजवळ आला आणि त्याने तू मला फार आवडतेस, असे म्हणून तिच्या अंगावर हात फिरवू लागला. 
 
घाबरलेल्या महिलेने त्याला जाब विचारून तिथून पळ काढला. घरी आल्यावर तिने तिच्या पतीला हा प्रकार सांगितला. 
 
तिचा पती दत्ताला जाब विचारायला गेला तर त्याने तिच्या पतीला मारहाण करत लोखंडी रॉड डोक्यात घातला. यात तिचा पती जखमी झाला आहे. 
 
या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी दत्ताविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक फौजदार चाबूकस्वार करत आहेत.