शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गुन्हेगारीला आळा घालण्यात फडणवीस सरकार अपयशी

maharashtra news
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार हाती घेतला, त्याला चार वर्षं झाली. या चार वर्षांत नागपूर शहराची क्राइम कॅपिटल अशी नवी ओळख होऊ लागली आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातही गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय. गुरुवारी पुण्यात पिंपरी येथे पोलिस आयुक्त कार्यालयासमोरच दोघांवर कोयत्याने वार झालेत. दोन युवक पहाटे दुचाकीवरून जाताना पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्यांनी गाडी आडवी घालून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. कायद्याचा धाकच राहिलेला नाही, असंच हे चित्र आहे.
 
दुसरीकडे अहमदनगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील कोळ्याची वाडी येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा दोन महिन्यांनंतरही शोध लागलेला नाही. वणवण भटकंती करूनही माता-पित्यांना ती सापडत नाहीये. तक्रार करूनही पोलिस गांभीर्याने शोध घेत नाहीत, म्हणून या मात्या-पित्यांनी ३१ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करून आत्मदहनाचा इशारा दिलाय...या बद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सोशल मिडीयावर सरकार विरोधात जोरदार टीका केली आहे.