1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (15:14 IST)

राज्यात सुमारे 325 तालुक्यांमधील 54 लाख 22 हजार हेक्टरवरील पिके बाधित

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.  
 
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (शनिवारी) बैठक बोलविण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
 
बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, यांच्यासह विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विविध विमा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतली. नुकसानीची स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रेसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती.  त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी. प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअ‍ॅप क्रमांकसुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
 
व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार आणि प्राथमिक माहितीनुसार  राज्यात सुमारे 325 तालुक्यांमधील 54 लाख 22 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
 
विभागनिहाय जे नुकसान झाले आहे, ते पुढीलप्रमाणे : कोकण (46 तालुके/97 हजार हेक्टर), नाशिक (52 तालुके/16 लाख हेक्टर), पुणे (51 तालुके/1.36 लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (72 तालुके/22 लाख हेक्टर), अमरावती (56 तालुके/12 लाख हेक्टर), नागपूर (48 तालुके/40 हजार हेक्टर).
साधारणत: 53 हजार हेक्टरवर फळपिके, 1 लाख 44 हजार हेक्टरवर भात, 2 लाख हेक्टरवर ज्वारी, 2 लाख हेक्टरवर बाजरी, 5 लाख हेक्टरवर मका, 19 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.