सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (20:23 IST)

"......म्हणून क्रूर मावशीने दिले चार वर्षीय बालकाला चटके"

crime
मस्ती करतो म्हणून साडेचार वर्षीय बालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या तळहातावर गरम तव्याचे चटके दिल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील चाईल्डलाईनच्या सुपरवायझर सायली जयदीप चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी दाम्पत्य हे आगरटाकळीतील समतानगर येथे राहते. हे दाम्पत्य त्या बालकाचे मावशी व काका लागतात. संशयित महिलेकडे त्यांच्या लहान बहिणीला दुसरे मूल झाल्याने तिने तिच्या साडेचारवर्षीय मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याला तिच्या मोठ्या बहिणीकडे चार महिन्यांपूर्वी पाठविल्याचे समजते.
 
दरम्यान, हा बालक मस्ती करतो, म्हणून दोघांनी त्याला अनेकदा समजावण्याचे प्रयत्न केले; मात्र त्याच्यात काहीच बदल होत नसल्याने संतापाच्या भरात आरोपी दाम्पत्याने संगनमत करून काल (दि. 17) दुपारी दोन वाजेच्या सुमारास या बालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच त्याच्या तळहातावर गरम तव्याने चटके दिले.
ही बाब लक्षात आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.