गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (17:32 IST)

ललित पाटील : पुणे पोलिसातील 2 शिपायांना अटक

lalit patil
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांनाच अटक झाली आहे. नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे.
 
एक ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेला होता तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते.
 
कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे.
 
ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक आलेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं.
 
15 दिवस देशभर पाठलाग, मुंबई पोलिसांनी 'असं' पकडलं ड्रग्ज माफियाला
पुण्यातील ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचं रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
 
अटक होण्यापूर्वी ललित पाटील पोलिसांपासून दूर पळत होता. पुणे, नाशिक आणि मुंबई पोलिसांची पथकं ललित पाटीलचा पाठलाग करत होती. अखेर मुंबई पोलिसांच्या पथकानं ललितला चेन्नईमधून अटक केली.
 
अटकेनंतर ललित पाटीलला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात सादर करण्यात आलं. त्यावेळी ललित पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाला की, "कोर्टातून रुग्णालयात घेऊन जात असताना त्याने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहात मी पळालो नाही, मला पळवलं गेल. मी कोणाकोणाचा हात आहे हे सांगेन."
 
या प्रकरणी पुणे पोलिसांनी 11 ऑक्टोबरला ललित पाटीलचा भाऊ आणि ड्रग्जच्या कारखान्यातील पार्टनर भूषण पाटील याला अटक केली होती.
 
आता मोठं नेक्सस बाहेर येईल - फडणवीस
ललित पाटीलच्या अटकेवर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
 
"मी पळालो नाही, तर मल पळवलं गेलं," या ललित पाटीलच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “यातून एक मोठं नेक्सस बाहेर येणार आहे आणि अनेक बोलणाऱ्यांची तोंडं बंद होणार आहेत.”
 
या प्रकरणावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ड्रग फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन ड्रग्जची साखळी तोडली पाहिजे असं आम्ही यंत्रणांना सांगितलं आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांना नाशिकमधल्या कारखान्याची माहिती मिळाली. त्याच्यावर त्यांनी धाड टाकली.
 
“वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे जे काम करतात त्यांच्यावर धाडी टाकलेल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. निश्चितपणे त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल. काही गोष्टी मी लगेच तुम्हाला सांगू शकत नाही. योग्य वेळी मी सांगेन. पण यातून एक मोठं नेक्सस आम्ही बाहेर काढणार आहोत.”
 
ससूनमधून असा पळला होता ललित पाटील
3 जून 2023 पासून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील 2 ऑक्टोबर 2023 रोजी रुग्णालयातून पळला.
 
ससून रुग्णालयातून 2 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजता उपचार कक्षातून ललित पाटील पसार झाला होता. जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलला तो पोहचला.
 
त्यांनतर तो रिक्षानं बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. तिथं आधीच तयारीत असलेल्या दत्ता डोके याच्या कारमध्ये तो बसला.
 
दत्ता डोके यानं त्याला रावेतपर्यंत पोहोचवलं. तिथं दत्ता डोकेच्या कारमधून तो उतरला आणि दुसर्‍या कारमध्ये बसून तो मुंबईला गेला, असं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं होतं.
 
दत्ता डोकेलाही पुणे पोलिसांनी अटक केली होती.
 
मुंबई पोलिसांनी चेन्नतून 'असं' पकडलं ललितला
ललित पाटीलला अटक केल्यानंतर आज (18 ऑक्टोबर) सत्य नारायण चौधरी, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था यांनी पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली.
 
या प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक झाल्याचं त्यांनी सांगितलं. अन्वर सईद यातला पहिला आरोपी होता.
 
ललित पाटील हा पंधरावा आरोपी आहे, NDPS अॅक्टअंतर्गत अटक त्याला अटक झाली आहे, असं सहआयुक्तांनी स्पष्ट केलं.
 
यापूर्वी या प्रकरणातील तपासात 50 किलो एमडी मिळाली होती, 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज मिळाले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
डोंगरी, पुणे, नाशिक, आंध्र प्रदेश, एमएमआर या ठिकाणी ड्रग्जच्या तपासासाठी छापे टाकले.
 
नाशिकला छापे टाकले होते. त्यानंतर बंगळुरू आणि चेन्नईच्या मध्ये एक जागा आहे तिथून त्याला ताब्यात घेतल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. त्यासाठई बंगळुरू आणि चेन्नईच्या पोलिसांसोबत काम केलं.
 
दरम्यान ललित चेन्नईतून कुठे जाण्याच्या प्रयत्नात होता, कसा गेला या सगळ्या गोष्टी पोलिस चौकशीतून समोर येतील, असंही त्यांनी सांगितलं.
 
पुण्यातून पळून जाणे आणि पळवून नेल्याप्रकरनी पुणे आयुक्तालयात IPC 224 स्वतंत्र केस आहे. त्याचा तपास स्वतंत्र होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
आमची केस ड्रग्ज रिलेटेड असल्याचं सांगितलं.
 
आजारपणासाठी जेलबाहेर, ससूनमधून ड्रग्जचं रॅकेट
एखाद्या प्रकरणात अटक असलेला आरोपी येरवडा जेलमधून आजारपणाच्या नावाखाली बाहेर पडतो आणि त्यानंतर ज्या आरोपासाठी अटक झाली आहे ते अंमली पदार्थांचे रॅकेट उघडपणे चालवतो.
 
इतकंच नाही तर रुग्णालयातच पुरवण्यासाठी अंमली पदार्थ मागवतो आणि हे उघडकीला येतं तेव्हा चक्क रुग्णालयातून पळूनही जातो! सिनेमातली वाटावी अशी घटना घडली होती.
 
हा सगळा प्रकार उघडकीला आला तो बंदोबस्त करणाऱ्या एका पोलिसामुळे. पुण्यातल्या ससून रुग्णालया पासून काही अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.
 
या परिसरात 30 सप्टेंबरला एका हवालदाराला एक माणूस पाठीवर बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरत असलेला दिसला.
 
संशय आल्याने हवालदाराने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि या चौकशी दरम्यानच त्याच्याकडे तब्बल 2.14 कोटी रुपयांचे 1.71 किलो मेफ्रेडोन किंवा एमडी ड्रग सापडले.
 
या आरोपी सुभाष मंडलकडे हे ड्रग कुठे घेऊन चालला होता याची चौकशी केल्यावर त्याच्याकडून रुग्णालयात दाखल असलेल्या ललित पाटीलचं नाव पोलिसांना कळालं.
 
चक्क ससून रुग्णालयातून कैदेत असलेल्या आरोपीकडून अंमली पदार्थांचं रॅकेट चालवलं जात असल्याचं उघड झालं.
 
कसं चालवत होता रॅकेट?
ललित पाटीलने ससून रुग्णालयात गेल्यावर दोन आयफोन मिळवले होते. पोलिसांच्या मते यातल्या एका फोनची किंमत 1.1 लाख रुपये आहे. याचाच वापर करुन तो हे रॅकेट चालवत होता. हे अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी त्याने रऊफ रहिम शेखला (वय 19) हाताशी धरले होते.
 
शेखच्या माध्यमातून ससूनमधून तो अंमली पदार्थ पुरवायचा. या शेखकडेच हे पदार्थ पोहोचवण्यासाठी मंडल ते घेऊन जात होता.
 
हा प्रकार उघड झाल्यानंतर पाटील राऊफ आणि मंडल विरोधात पुण्यातल्या बंडगार्डन पोलिस स्टेशन मध्ये कलम ३०६/२०२३ आणि एन पी डी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
1 तारखेला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तारखेला शस्त्रक्रिया करायची असल्याने ललित पाटील रुग्णालयातच मुक्कामी होता. शस्त्रक्रीयेच्या आदल्या दिवशी एक्स रे काढण्यासाठी त्याला एक पोलिस हवालदार ससून रुग्णालयाच्या ग्राऊंड फ्लोअरवर घेऊन आला आणि त्यावेळी पोलिसाच्या हाताला झटका देऊन पाटील तिथून फरार झाला.
 
ससून बाहेर येत त्याने रिक्षा पकडल्याचे त्याला आणलेल्या पोलिसाने जबाबात म्हणले आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलं होतं की, "पोलिसांच्या विविध तुकड्या त्याचा शोध घेत आहेत. तो रुग्णालयात असल्याने आणि तिथून फरार झाल्याने तो हे अंमली पदार्थांचे रॅकेट कसे चालवत होता याबाबत चौकशी करण्यात येत आहे."
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ससूनमध्ये पोलिस निरीक्षकांसह जवळपास 112 गार्ड ड्युटीवर असतात. त्यांच्याक़डे या कैद्यांच्याच वॉर्डची देखरेख करण्याची जबाबदारी असते.
 
या प्रकरणी हलगर्जीपणा झाला म्हणून आता 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
 
ससून रुग्णालयाचं प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात
ससून रुग्णालयातील अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या पलायनानंतर इथं सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या 360 पोलीस गार्डची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं.
 
पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी माहिती दिली होती.
 
ससून रुग्णालयातील आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी ललित पाटील याला मदत करत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
 
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याचं रुग्णालय प्रशासनानं आणि येरवडा कारागृह प्रशासनाला पुणे पोलिसांनी कळवलचं नाही. ससून रुग्णालयातून ललित पाटील पळून गेल्यानंतर तब्बल दीड तासानंतर पुणे पोलिसांनी प्रशासनाला माहिती दिली गेली होती.