17 वर्षांखालील गटात नाशिककर सायकलिस्टची निर्विवाद हुकूमत
नाशिकमध्ये आयोजित राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत खुल्या गटाच्या 100 किमीच्या पुरुष गटात सांगलीचा राष्ट्रीय खेळाडू दिलीप माने याने 2 तास 58 मिनिट आणि 31 सेकंदात स्पर्धा पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय स्थानी मुंबईचा मिहीर जाधव आणि सांगलीच्याच प्रकाश आळेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. घाटाचा राजा हा महत्वाचा किताब प्रकाश आळेकर याने पटकावला. नाशिकचे गोपीनाथ मुंडे, भारत सोनवणे यांनीही चांगले प्रयत्न केले. 100 किमीची स्पर्धा त्र्यंबकेश्वर रोड मार्गे आंबोली घाट - पवार वाडी - पुढे त्याच मार्गाने रेशीमगाठ लॉन्स अशी झाली.
नाशिकचे वैभव आणि ओळख असेलल्या चांदीचा गणपती अर्थात रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकपूर्ती निमित्ताने तसेच मंडळाचे दिवंगत राष्ट्रीय सायकलपटू कै. राजेंद्र चांदवडकर आणि लोकप्रिय नाशिक सायकलिस्ट संघटक दिवंगत जसपालसिंग विर्दी यांच्या स्मृतींना अभिवादन करीत सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्रशी संलग्न नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या मान्यतेने रविवारी (दि. 30) खुल्या गटाच्या राज्यस्तरीय 100 किमीच्या स्पर्धेसह मुला मुलींच्या विविध गट आणि वेटरन गटासाठी 40 आणि 15 किमी अशा एकूण आठ गटांत या सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 500 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला.
स्पर्धकांच्या हस्ते चांदीच्या गणपतीची आरती करून स्पर्धेचे उद्धाटन झाल्यानंतर सर्व गटांच्या स्पर्धा त्र्यंबकेश्वर रोड येथील पपया नर्सरी पासून सुरू झाल्या. मुलींच्या खुल्या गटात 40 किमीच्या स्पर्धेत अहमदनगरच्या प्रणिता सोमण हिने 58 मिनिट आणि 28 सेकंदात स्पर्धा पूर्ण करताना प्रथम क्रमांक पटकावला. तर अंजली रानावले, पुणे (1 तास, 2 मिनिट) आणि प्रियांका करंडे, सांगली (1 तास, 2 मिनिट, 7 सेकंद) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
तर 17 वर्षांखालील 15 किमीच्या स्पर्धेत मुले आणि मुलींच्याही गटात नाशिकच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व दाखवले आहे. मुलांमध्ये निसर्ग भामरेने प्रथम, जतीन जोशी द्वितीय आणि ओम महाजन तृतीय तर मुलींमध्ये करिना देवरे या नाशिककर खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावला.यावेळी बोलताना खुल्या गटाच्या 100 किमीच्या स्पर्धेचे विजेते दिलीप माने म्हणाला की, नाशिकचे वातावरण सायकलिंग साठी उत्तम असून नाशिकमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी यायला येऊध्ये नक्कीच आवडेल. घाटातील रास्ता बराच खराब असल्याने अडचणी आल्या मात्र याशिवाय स्पर्धेला रंगतदेखील आली नसती असे मत माने याने व्यक्त केले.
नाशिकचे पोलीस निरीक्षक संजय दराडे, रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव संजय साठे, राष्ट्रीय स्तरावरचे नाशिकच्या संघाचे प्रशिक्षक लीलाधर शेट्टी, प्रकाश शिंदे, सुदाम रोकडे, अनिल तांबे, प्रदीप कदम, साईनाथ थोरात, संजय पायकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार, सतीश आमले, रवींद्र पाटील, अनिल गोरे, दीपक पवार, पोपट नागपुरे, प्रफुल्ल संचेती, नाशिक जिल्हा सायकलिंग असो.चे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, सचिव नितीन नागरे, सदस्य मिलिंद धोपावकर, नाशिक सायकलिस्ट संघटक डॉ. मनीषा रौंदळ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
असा आहे स्पर्धेचा निकाल :
1) 100 किमी : 18 वर्षापुढील खुला गट पुरुष
प्रथम : दिलीप माने, सांगली
द्वितीय : मिहीर जाधव, मुंबई
तृतीय : प्रकाश आळेकर, सांगली
2) 40 किमी : 18 वर्षापुढील खुलागट महिला
प्रथम : प्रणिता सोमण, अहमदनगर
द्वितीय : अंजली रानावले, पुणे आणि
तृतीय : प्रियांका करंडे, सांगली
3) 40 ते 50 वर्ष गट पुरुष १५ किमी
प्रथम : समीर नार्वेकर
द्वितीय : हिरामण अहिरे
तृतीय : दिनकर पाटील
4) 50 वर्षावरील गट पुरुष
प्रथम : मरियम डिसुझा
द्वितीय : माणिक निकम
तृतीय : सुधाकर पटनाकर
5) 10 वर्षाखालील गट 4 किमी किशोर/किशोरी
प्रथम : पुण्य मकवाना
द्वितीय : सिराज परब
तृतीय : मोक्ष सोनवणे
6) 12 वर्षाखालील गट 7 किमी किशोर
प्रथम : शौर्य मकवाना, मुंबई
द्वितीय : मल्हार नवले, नाशिक
तृतीय : रिहान हकीम, नाशिक
7) 12 वर्षाखालील गट 7 किमी किशोरी
प्रथम : ऋतू भामरे, नाशिक
द्वितीय : जस्मित कौर, उल्हासनगर
तृतीय : तनुजा बागुल,
8) 14 वर्षाखालील गट 10 किमी कुमार
प्रथम : सोहम नागरे, नाशिक
द्वितीय : नित कापबाने, मुंबई
तृतीय : देवर्षी पाटील, पेण
9) 14 वर्षाखालील गट 10 किमी कुमारी
प्रथम : किना गावित
द्वितीय : सारा नागरे, नाशिक
तृतीय : साक्षी छाबलिया
10) 17 वर्षाखालील गट 15 किमी कुमार
प्रथम : निसर्ग भामरे, नाशिक
द्वितीय : जतीन जोशी नाशिक
तृतीय : ओम महाजन, नाशिक
11) 17 वर्षाखालील गट 15 किमी कुमारी
प्रथम : करीना देवरे, नाशिक
12) घाटाचा राजा : प्रकाश आळेकर, सांगली