'त्याने' चक्क पोलिसांकडे केली वडीलांची तक्रार
जामनेरमधील एका मुलाने चक्क ‘माझे वडील मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, इतकंच नाही तर आईलाही मारतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी तक्रार थेट पोलीस स्टेशनमध्ये केली. वडिलांची तक्रार घेऊन आलेल्याची मुलची पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी समजूत काढली. तसेच त्याला नवीन कपडे घेऊन दिले. त्यानंतर त्यांनी पालकांना बोलावून त्यांनाही समजावून सांगितलं.
12 वर्षांच्या या मुलाची आई शेतात मजुरी करते आणि वडील गवंडी काम करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुले शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात. सकाळी साडेअकराच्या सुमारास पाऊस सुरू असताना हा मुलगा हाफ पॅण्ट आणि बनियनवरच पोलीस ठाण्यात आला. त्याने माझे वडील मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतात, आईलाही मारतात त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी तक्रार केली. त्यावेळी पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस कर्मचारी निलेश घुगे यांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. त्याला दुकानात नेले, कपडे घेऊन दिले. मुलगा म्हणाला, मला सॅण्डलसुद्धा पाहिजे. मग त्याला सॅण्डलही घेऊन दिली.