1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (20:32 IST)

दामदुप्पट रकमेचे आमिष भोवले अन्‌‍ वृद्धाने 17 लाख रुपये गमावले

नाशिक  :- ट्रेडिंग कंपनीच्या मार्फत दामदुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून नांदेडच्या भामट्याने एका वृद्धाची 17 लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विश्वास जगन्नाथ कांबळे (वय 65, रा. महादेव रो-हाऊस, गणेश कॉलनी, अश्वमेधनगर, पेठ रोड) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. आरोपी पवन वासुदेव कोकाटे याची नांदेड येथे धनलक्ष्मी शेअर्स ट्रेडिंग नावाची फर्म आहे.
 
या कंपनीच्या माध्यमातून कोकाटे हा शेअर्सचे काम करतो. त्यादरम्यान, आरोपी कोकाटे याने फिर्यादी विश्वास कांबळे यांच्याशी संपर्क साधला. कंपनीमार्फत 200 व 100 दिवसांत पैसे दामदुप्पट करून देतो, असे आमिष फिर्यादी कांबळे यांना दाखविले. त्यानुसार दि. 5 मे ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधीत कांबळे याच्याकडून आरोपी पवन कोकाटे याने वेळोवेळी फोन पे व आर. टी. जी. एस. द्वारे 18 लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपी कोकाटे याने फिर्यादी कांबळे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्यांना 1 लाख 8 हजार 500 रुपयांची रक्कम दिली; मात्र ही रक्कम दिल्यानंतर बरेच दिवस झाले, तरी गुंतवणूक केलेल्या 17 लाखांपोटी दामदुप्पट पैसे मिळाले तर नाहीतच, शिवाय उर्वरित रक्कमही परत न देता फिर्यादी कांबळे यांची 16 लाख 91 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.
 
याबाबत कांबळे यांनी आरोपी कोकाटे यांच्याशी वारंवार संपर्क साधून पैसे परत करण्याची मागणी केली; मात्र त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पवन कोकाटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.