जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचा मृत्यू, 60 वर्षांनंतर जबरदस्तीने अंघोळ घातली होती
'जगातील सर्वात घाणेरडा माणूस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इराणच्या अमो हाजीचा मृत्यू झाला. हाजीने गेल्या 60 वर्षांपासून आंघोळ केली नव्हती. काही दिवसांपूर्वी त्याच्या गावातील लोकांनी आंघोळ घातली होती. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
अमो हाजी हा दक्षिण इराणमधील देजगाह गावचा रहिवासी होता. त्याला कोणीही नातेवाईक नव्हते. तो विटांनी तयार खुल्या झोपडीत एकटाच राहत होता. तरुणपणातील काही घटनांमुळे हाजीने पाणी आणि साबण न वापरण्याचा आग्रह धरला होता आणि आंघोळ केल्याने आजारी पडण्याची त्याला भीती वाटत होती. यामुळे हाजी जवळपास 60 वर्षे आंघोळीशिवाय राहिल्यानंतर गावकर्यांनी त्याला बळजबरी अंघोळ घातली होती.
हाजी रस्त्यावर वाहनांनी मेलेल्या प्राण्यांचे मांस खात आणि प्राण्यांच्या विष्ठेने भरलेल्या पाईपमधून धूर काढत होता. 2013 मध्ये हाजीच्या जीवनावर 'द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमाऊ हाजी' नावाचा डॉक्युमेंट्री फिल्मही बनवण्यात आली होती.
काही आठवड्यांपूर्वी त्याच्या गावकऱ्याने त्याला स्वच्छ करण्याच्या उद्देशाने आंघोळ घातली होती. आंघोळ केल्यानंतर काही आठवड्यांनी त्याचा मृत्यू झाला.