शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जून 2024 (14:37 IST)

रशियातल्या ‘नदीत पोहोण्यास बंदी’ असतानाही जळगावचे विद्यार्थी पाण्यात उतरले आणि

water death
रशियात MBBS करणाऱ्या जळगावच्या 4 विद्यार्थ्यांचा 4 जून रोजी नदीत वाहून मृत्यू झाला.
रशियातील नोवगोरोड शहरात ही घटना घडली, तेव्हा स्थानिकांना रशियातील वोल्कोव्ह नदीच्या या परिसरातील पाण्यात उतरण्यास सक्त मनाई होती.
 
त्यामुळे जवळपास कुणी लाईफगार्ड्स म्हणजे पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवणारेही नव्हते.
 
रशियातील सेंट पीटसबर्गमधील भारतीय दुतावासाच्या कॉन्सुलेट जनरलने दिलेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
 
मृतांमध्ये जळगावच्या जिया, जिशान, हर्षल आणि मिरा रोड इथल्या गुलाम गोस मलिक यांचा समावेश आहे.
 
शुक्रवारी (14 जून) सर्वांचे पार्थिव कुटुंबियाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याचं भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
या दुर्दैवी घटनेनंतर नोव्हगोरोड विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांसोबत बैठक घेऊन या काळात नदीत न उतरण्याचं आवाहन केल्याचं कॉन्सुलेट जनरल यांच्या अहवालात नमूद केलं आहे.
 
4 जून रोजी एकूण 5 भारतीय विद्यार्थी नदीत वाहून गेले. त्यापैकी निशा सोनावणे हिला रशियातील स्थानिकांना वाचवण्यात यश आले.
 
वाहून गेलेल्या 4 मुलांचा शोध घेण्यासाठी 35 स्कुबा डायव्हर्सची रात्रंदिवस मदत घेण्यात आली होती.
 
4 जून रोजी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास आणि रशियातील रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
 
जिशान, जिया आणि भडगाव येथील हर्षल संजय देसले, मुंबई येथील गुलाम गोस मलिक हे चार विद्यार्थी शहरातील वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते.
नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई शमीम यांना व्हीडिओ कॉल केला. तेव्हा रात्रीचे सव्वाअकरा वाजले होते. जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता.
 
लगेच शमीम यांनी जिशान याला सांगितले की, "बेटा तू पाणी में मत जा, और जिया को भी बाहर निकाल और जलदी घरपे पहुंचो ..."
 
आपल्या आईला त्याने सकारात्मक प्रतिसाद देत, त्याने लगेच व्हॉट्सअपवर संदेश टाकला की आम्ही घरी जातो. अवघ्या 15 मिनिटात नदीला पूर आला अन क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहू लागले.
उपस्थितांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले, परंतु जिशान आणि जिया यांचा सापडले नाहीत. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अशपाक पिंजारी यांच्या तेथील नातेवाईकांनी ही घटना कळवताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यामुळे रात्री सव्वा अकराच्या सुमारास झालेला व्हीडिओ कॉल शेवटचा ठरला होता.
 
रशिया येथे तेथील डॉक्टर दिनेश हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तेथील यंत्रणा विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रांताधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कुटुंबीयांच्या घरी पाठवले. दोन्ही अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. रशिया येथील सेंट पीटर्सबर्ग येथील दुतावासातील राजदूत डी. डी. दास यांचा फोननंबर दिला.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रशासनाशी संपर्क करून मदतीत कोणतीही अडचण येऊ नये अशा सूचना दिल्या.राजदूत डी. डी. दास यांनी देखील पिंजारी कुटुंबीयांना योग्य त्या मदतीचे आश्वासन देऊन संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या.
 
जिशान आणी जिया हे दोन्हीही सेंट मेरी शाळेचे विद्यार्थी होते. अशपाक पिंजारी यांनी मुलगा व भाची दोघांना शिक्षणासाठी पाठवले होते. जिशानला एक बहीण आहे तर जियाला एक भाऊ आहे. अशपाक पिंजारी हे हळदीची शेती करतात.
 
अशपाक पिंजारी यांनी नुकतेच दोघांना परत भारतात सुटीवर येण्यासाठी पैसे पाठवले होते. पुढील महिण्यात 23 जुलै रोजी त्यांनी विमानाचं बुकिंग करून ठेवलं होतं.
 
Published By- Priya Dixit