माजी मंत्री नवाब मलिक हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी बाकावर बसल्याचं दिसून आलं.
या गोष्टीचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नाही, असं स्पष्ट मत फडणवीसांनी या पत्रात व्यक्त केलं आहे.
यावर अजित पवार काय भूमिका घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मुंबईतील एका जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी ईडीने चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तब्बल दीड वर्षानंतर नवाब मलिक तुरुंगाबाहेर आले होते.
याप्रकरणी ऑक्टोबर 2023 मध्ये नवाब मलिक यांच्या जामिनाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 3 महिन्यांनी वाढवली.
त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आहे.
पत्रात काय म्हटलं आहे?
या पत्रात फडणवीसांनी लिहिलंय, “माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. पण, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे.
“सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे."
“आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. पण, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.”
काँग्रेसचा भाजपवर पलटवार
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलंय की, “फरक स्पष्ट आहे. अटक होऊनसुद्धा नबाब मलिक यांचा सत्तेसाठी लाचार होत राजीनामा न घेणारे उद्धव ठाकरे कुठे आणि सत्ता येते-जाते पण देश महत्वाचा सांगत नबाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध करणारे देवेंद्रजी कुठे!”
काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, “नवाब मलिक यांना पुरवणी मागण्यात निधी दिला आहे. आता जे ट्विट केले, ते आमच्या बरोबर नाहीत म्हणून हे दाखवण्याचा प्रयत्न असेल. महायुतीत इतर, आमदार यांना जसे निधी दिला तसे त्यांना ही मिळालं.
“भाजपवर आरोप होऊ नये म्हणून हे ट्विट केले आहे. देशद्रोही म्हणून उल्लेख केला. देशद्रोही माणूस बाजूला बसला तर प्रश्न निर्माण होईल. सोबतही हवेत पण जवळही नको असा हा प्रकार आहे.
“त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र देऊन अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. ते महायुती बरोबर आहेत. नवाब मलिक कुठे राहतील हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.”
शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनीही या प्रकरणावर बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “माजी मंत्री नवाब मलिक साहेब यांच्याबाबत भाजप नेत्यांनी आधी खोटे आरोप करून रान उठवलं आणि आज सकाळी त्यांना सभागृहात नवाब मलिक साहेब यांचाच बचाव करावा लागला. परंतु यामुळं टीका होऊ लागताच लगेच पत्रप्रपंच करून स्वतःची प्रतिमा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु झालाय.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे राज्यात सर्वाधिक गोंधळलेला आणि भूमिकाहीन पक्ष म्हणजे भाजपा आहे.. म्हणूनच त्यांच्या नेत्यांना त्यांच्याच भूमिकांचा विसर पडतोय.. भाजपची ना कुठली ठोस भूमिका, ना कुठली विचारधारा… यांची भूमिका एकच, ती म्हणजे केवळ आणि केवळ सत्ता.
असो!
मित्र मंडळ स्वायत्त नसल्याची बाब या पत्राच्या निमित्ताने स्पष्ट झाली आणि गुवाहाटी मंडळाबाबत तर न बोललेलंच बरं!”
एका उपमुख्यमंत्र्याकडे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा बहुतेक नंबर नाहीये. कारण असे प्रश्न फोनवरून सांगायला पाहिजे मात्र देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती असेल असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
तर 'पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची' असा खोचक टोला शिवसेना (उबाठा गट) नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
'अजितदादा योग्य तो निर्णय घेतील'
"देवेंद्रजींनी पाठवेलंलं पत्र मी वाचलं नाही. जर या पत्रात योग्य तो विचार करावा असं लिहिलं असेल तर अजितदादा योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे मी भाष्य करणं योग्य नाही," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी लिहिलं आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"देवेंद्रजींनी सत्तेपेक्षा देश मोठा आहे असं म्हटलं आहे. मग इतर लोकांना सामावून घेताना देश कुठे गेला होता?"
अजित पवार गट बॅकफुटवर
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते एक्स वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, “आमदार श्री नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे”.
भंगारवाला ते मंत्री
नवाब मलिक यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशचं. तिथं त्यांची शेती आणि इतर व्यवसाय होते. आर्थिक स्थितीही ठिकठाक होती.
नवाब यांचे वडील मोहम्मद इस्लाम मलिक हे त्यांच्या जन्मापूर्वीच मुंबईत स्थायिक झाले.
पण पहिल्या अपत्याच्या बाळंतपणासाठी म्हणून ते पुन्हा उत्तर प्रदेशात गेले. आईच्या माहेरी म्हणजेच उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला तालुक्यात दुसवा गावात 20 जून 1959 ला नवाब यांचा जन्म झाला.
त्यानंतर मलिक कुटुंब पुन्हा मुंबईला परतलं.
मुंबईत मलिक कुटुंबांचे लहान-मोठे व्यवसाय होते. त्यांच्या मालकीचं एक हॉटेल होतं. त्याव्यतिरिक्त भंगार व्यवसाय आणि इतर काही कामं ते करायचे.
मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं.
वयाच्या एकविसाव्या वर्षी 1980 साली नवाब यांचा विवाह मेहजबीन यांच्याशी झाला. त्यांना फराज, आमीर ही दोन मुलं तर निलोफर आणि सना या दोन मुली आहेत.
बाबरी प्रकरणानंतर मुस्लीम मतदारांमध्ये समाजवादी पक्ष लोकप्रिय होऊ लागला होता. याच लाटेत नवाब मलिक यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुस्लीम बहुल मानल्या जाणाऱ्या नेहरूनगर मतदारसंघाचं तिकीट पक्षाकडून मिळालं.
त्यावेळी शिवसेनेचे सूर्यकांत महाडिक यांनी 51 हजार 569 मते मिळवून विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मलिक यांना 37 हजार 511 मते मिळाली.
मलिक पराभूत झाले, पण पुढच्याच वर्षी या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लागली.
आमदार महाडिक यांनी धर्माच्या आधारावर मतं मागितल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू होती. यात ते दोषी आढळल्याने निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द ठरवली. त्यामुळे नेहरू नगर मतदारसंघात 1996 साली पुन्हा निवडणूक लागली.
यावेळी मात्र नवाब मलिक यांनी सुमारे साडेसहा हजारांच्या फरकाने विजय मिळवला.
जावयावरील कारवाईमुळेच सुडबुद्धीने बदला घेत असल्याचा आरोप
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर त्याचा सर्वाधिक आक्रमक विरोध नवाब मलिक यांच्याकडूनच झाला.
पण जावयावर केलेल्या कारवाईमुळेच नवाब मलिक अशा प्रकारे NCBवर सुडबुद्धीने आरोप करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली.
NCBला 9 जानेवारी 2021 ला काही संशयास्पद हालचालींचा सुगावा लागला होता.
समीर वानखेडेंच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकामध्ये "मुंबईतील वांद्रे भागातून गांजा जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता."
यात आरोपी करण सजलानीच्या घरातून गांजाचा इंपोर्टेड प्रकार जप्त केल्याची माहिती दिली होती. चार आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर सर्वांत पहिल्यांदा नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचं नाव पुढे आलं.
समीर खान हे मलिक यांनी ज्येष्ठ कन्या निलोफर यांचे पती आहेत.
एनसीबीने NDPS कायद्याच्या कलम 27 (A) अंतर्गत समीर खान यांना ड्रग्जची तस्करी आणि पैसे पुरवल्याच्या आरोपाप्रकरणी जानेवारी महिन्यात अटक केली होती.
या प्रकरणात सेशन्स कोर्टाने समीर खान यांना 14 ऑक्टोबर रोजी जामीन दिला आहे.
समीर खान यांच्यावरील ड्रग्जची तस्करी आणि ड्रग्जसाठी पैसा पुरवण्याचे आरोप टिकत नसल्याचं कोर्टाने जामीन मंजूर करताना नमूद केलं आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी, "एनसीबी लोकांना खोट्या गुन्ह्यात गुंतवून नाहक बदनाम करण्याचं काम करते, 200 किलो गांजा मिळाला, असं NCB ने म्हटलं, पण हा हर्बल तंबाखू असल्याचं रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं," असा आरोप केला.
नवाब मलिक यांच्या आरोपांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.