बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (14:19 IST)

देवेंद्र फडणवीस: 'नवाब मलिकांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतली'

राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून जमीन विकत घेतली असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.
 
नवाब मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली असं फडणवीस म्हणाले.
 
1993 बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी एलबीएस रोडवर जागा विकत घेतली आहे.
 
आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली असं देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे.
सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती.
 
1 लाख 23 हजार स्क्वेअर फूट. गोवावाला कंपाऊंड. एलबीएस मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ही जमीन. या जमिनीची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर. ही कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार खरा झाला की केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता, याचा तपास होणे आवश्यक आहे, असं फडणवीस यांनी म्हटले.
 
नवाब मलिकांविरोधातले पुरावे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संबंधित एजन्सीजकडे देणार आहे असं फडणवीस यांनी म्हटले.
 
नवाब मलिक हे आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तेव्हा ते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देतील.
 
नवाब मलिकांनी काय आरोप केले होते?
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.
 
"जयदीप राणा या व्यक्तीचा मी ट्विटरवर फोटो टाकला आहे. ड्रग्ज संदर्भात राणा यांना अटक करण्यात आली आहे. तो सध्या साबरमती जेलमध्ये आहेत. त्याचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहेत," असा आरोप मलिक यांनी केला होता.
 
ते पुढे म्हणाले, "फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छतेविषयीच्या मोहिमेचं गाणं गायलं होतं. या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचे चांगले संबंध आहेत."
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यवसायाशी काय संबंध आहेत, त्यांचे आणि जयदीप राणाचे काय संबंध आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली होती.
 
देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं, "दिवाळीच्या सुरूवातीला लवंगी फटका वाजवून काहीतरी मोठं केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. चार वर्षांपूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलाय. रिव्हरमार्चने याचा खुलासा केलाय की तो व्यक्ती क्रिएटिव्ह टीमने हायर केला. त्यावेळी हे फोटो काढलेत.
 
"मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो टाकला यावरून त्यांची मानसिकता दिसते. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीशी फोटो दिसल्यास भाजपचा ड्रग्ज पेडलरशी संबंध असं तुम्ही म्हणत असाल, तर नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडले. मग ज्यांच्या घरी ड्रग्ज सापडले त्यांच्या पार्टीला ड्रग्ज माफिया म्हणायचं का?"
 
"दिवाळी झाल्यानंतरच बॅाम्ब मी फोडणार आहे. मा काचेच्या घरात राहात नाही. दिवाळी झाल्यावर नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत, याची पुरावे मी शरद पवार आणि जनतेला देईल," असंही फडणवीस म्हणाले होते.