शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (08:11 IST)

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची रात्री पोलीस ठाण्यात ‘एन्ट्री’ ! बड्या आधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले?

ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी डोकनिया यांना पोलिसांनी रात्री उशिरा सोडून दिले.
 
बीकेसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री हा हाय ड्रामा झाला. रेमडेसिवीर इंजेक्शनवर सध्या राजकारण सुरु आहे. केंद्र व राज्य शासन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्या संदर्भात डोकनिया यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हे समजताच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड हे बीकेसी पोलीस ठाण्यात धावले. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
 
त्यानंतर राजेश डोकनिया यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रूक फार्माच्या अधिकार्‍याला ताब्यात घेण्याचा शासनाचा हा प्रकार अतिशय दुदैवी आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करुन धमकी देतो. विरोधी पक्षाच्या सांगण्यावरुन तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो. आणि सायंकाळी पोलीस त्यांना ताब्यात घेतात, हे सर्व अनाकलनीय आहे.
 
महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वत: केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना कायद्यानुसार नाही, एवढेच मी म्हणेन, अशा शब्दात फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली.