1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सिंधुदुर्ग , मंगळवार, 25 मे 2021 (19:41 IST)

देवेंद्र फडणवीस – उदय सामंत यांची रत्नागिरीत गुप्त भेट; निलेश राणेंचा गौप्यस्फोट

शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 
तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली, असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट झाली का, भेट झाली असल्यास त्याचं नेमकं कारण काय, दोघांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.