बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:04 IST)

पुरावे खोटे असतील तर धनंजय मुंडेला राज्यातल्या कुठल्याही चौकात फाशी द्या

आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर राईट टू रिप्लाय अंतर्गत विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे  व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे  बोलले.

विरोधकांच्यावतीने अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे पुराव्यांसह मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा पुरावा दिला. पण प्रत्येक अधिवेशनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले. आमचे पुरावे खोटे असतील तर धनंजय मुंडेला राज्यातल्या कुठल्याही चौकात फाशी द्या. पण आम्ही सभागृहात मांडलेले पुरावे खोटे नव्हते, असे मुंडे यांनी ठणकावून सांगितले.

राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासार्हता आहे ती टिकावी अशी अपेक्षा आहे. कारण भ्रष्ट मंत्र्यांना वाचवता वाचवता "कहि आप ना मैले हो जाये, ये चिंता हमे सताती है", असंही ते म्हणाले. पुराव्यांसह आरोप करूनही मुख्यमंत्री फक्त "निश्चितच चौकशी करु" एवढेच म्हणाले. आमच्यासाठी एवढं पुरेसे नाही. या पारदर्शक सरकारला कारवाई करायची आहे की नाही? जोपर्यंत मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही हे पारदर्शक सरकार आहे, असं मानणार नाही, असे मुंडे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्र्यांची लोकायुक्तांमार्फत आणि उद्योगमंत्र्यांची फक्त चौकशी करण्याचे आश्वासन दिले. महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी ज्यांचे दात घशात घातले त्यांचेच दात पुन्हा लावायचे काम मुख्यमंत्र्यांनी करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

तर, मुख्यमंत्री सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? जो न्याय गृहनिर्माण मंत्र्यांना लावला आहे तोच न्याय उद्योग खात्याला लावून उद्योग मंत्र्यांची लोकायुक्तद्वारे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली.