मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 मार्च 2018 (16:37 IST)

सट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का?

dhananjay munde

मुंबईत असलेल्या अचल चौरासियाला मध्य प्रदेश पोलीस अटक करतात, मग महाराष्ट्र पोलिसांना तो का सापडत नाही. तो पोलिसांचा जावई आहे का? महाराष्ट्रातील पोलिसांनी येथील गुन्ह्यासाठी चौरासियाला का मागितले नाही? याचे उत्तर मंत्री देत नाहीत. निव्वळ विषयाला बगल देण्याचे काम मंत्री करत असून त्या चौरासिया बंधुंचे समर्थन शासन करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे   यांनी केला. नियम १८७ अन्वये त्यांनी लक्षवेधी उपस्थित केली. 

‘गेम किंग इंडिया’ या नावाने ऑनलाईन साखळी सट्टा चालवून दररोज कोटयवधी रुपयांचा गंडा घालणारा अचल चौरासिया मध्य प्रदेशच्या पोलिसांना सापडतो, मात्र महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला कधी अटक करणार आणि ऑनलाईन वेबसाईट किती तासात बंद करणार याचे उत्तर सरकारने दयावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पत्रकारांनी एखादी माहिती छापली, तर ती माहिती कशी आणि कुठून मिळवली हे शोधून काढले जाते आणि जेलमध्ये टाकले जाते. मात्र एवढया मोठया प्रमाणात पोलिसांच्या मदतीने सट्टा सुरु असताना चौरासिया पोलिसांना सापडत नाही, याचेच आश्चर्य वाटते, अशी उपहासात्मक टीका धनंजय मुंडे यांनी सरकारवर केली.

सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत नवीन कायदा आणणार का? तसा कायदा आणल्यास त्या कायद्यात अजामीनपात्र गुन्हयाची नोंद व्हावी आणि त्यात कठोर शिक्षा असणार का? याची माहिती देण्याचीही मागणी मुंडे यांनी केली. यावर गृहराज्यमंत्र्यांनी ऑनलाईन सट्टा किंवा लॉटरी चालवून लोकांची फसवणूक करणाऱ्याविरुध्द व जुगाराचा अड्डा चालविणाऱ्याविरुध्द आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

याच मुद्द्यावर आ. हेमंत टकले यांनी आपले मत मांडले. तपास यंत्रणांचे काम नीट नाही किंवा ही यंत्रणा गुन्हेगारीला साथ देत आहे. हे गुन्हे नव्या काळयातील आहेत. केंद्राच्या गृहखात्याचे सहकार्य घेऊन स्वतंत्र एसआयटी नेमावी, अशी मागणी आ. टकले यांनी चर्चेत भाग घेत केली.

दरम्यान, या चर्चेत भाग घेत शिवसेनेचे आ. अनिल परबही आक्रमक झाले होते.