शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:09 IST)

गुगलवर ‘टरबूज’ सर्च करून पाहा, मग कळेल गद्दार कोण? : खडसेंची फडणवीस, महाजनांवर बोचरी टीका

माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध पुन्हा पेटले असून आज पुन्हा खडसेंनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला समजले असून बीएचआर घोटाळ्यातून महाजनांनी १० कोटींची मालमत्ता खरेदी केली असून आपल्याकडे उतारे असल्याचा दावा एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
 
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच जुंपली असून मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यात उडी घेतली आहे. कालच आ.गिरीश महाजन यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊद्या म्हणत खडसेंना खुले आव्हान दिले होते. त्याला खडसेंनी पुन्हा प्रत्युत्तर दिले असून माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केले आहे. टीव्ही ९ ने याबाबत वृत्त दिले आहे.
 
एकनाथराव खडसे म्हणाले आहे कि, नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही 10 कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला. मी तुमचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला. त्यामुळेच त्यांचा जीव धकधक करत आहे. गरीबांच्या ठेवींवर यांनी दरोडे घातले आहेत, असा हल्ला खडसेंनी चढवला. ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात माझ्याविषयीची चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं ते म्हणाले.
 
खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली असून, राष्ट्रवादीत आल्यानंतरच मला भाजपमधील नीच आणि गद्दार कोण हे समजलं आहे. मी चाळीस वर्ष जीवाची पर्वा न करता भाजपमध्ये काम केलं. त्याच गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला. हे गद्दार कोण आहेत हे एकदा गुगलवर सर्च करून पाहा. टरबूज असं सर्च करून पाहा, मग कळेल गद्दार कोण?, अशी टीका त्यांनी फडणवीसांचं नाव न घेता केली आहे. तसेच माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. दाऊद व दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध जोडले. माझं मंत्रिपद काढून घेतलं, असा हल्लाबोलही त्यांनी फडणवीसांवर केला.