मराठी माणूस हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटताय, लाज नाही वाटत तुम्हाला?
बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मात्र मोठा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “बेळगावमध्ये मराठी माणूस हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटताय, लाज नाही वाटत तुम्हाला?” असा सवालच संजय राऊता यांनी भाजपाला केला आहे.
संजय राऊत यांनी यावेळी बोलताना बेळगावमधील निकालांमागे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “मराठी माणूस बेळगावमध्ये सत्ता स्थापन करेल अशी आम्हाला खात्री होती. याआधी बेळगावमध्ये मराठी एकजुटीचाच विजय झाला आहे. पण आज २ किंवा ३ जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्दैवी जरी असलं, तरी यामागे किती कारस्थान झालं असेल, याची कल्पना करवत नाही. कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगाववर महाराष्ट्राचा हक्क राहू नये, यासाठी काय गडबड केली आहे त्यासंदर्भात माहिती हळूहळू समोर येईल”, असं ते म्हणाले.
“बेळगावात मराठी माणसाच्या झालेल्या पराभवाबद्दल आज महाराष्ट्रात ज्यांना उकळ्या फुटत आहेत, जे आज पेढे वाटतायत, त्यांना एवढंच सांगतो की महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासात इतकी नादानी, इतका नालायकपणा आणि मराठी माणसाच्या बाबतीत इतकी गद्दारी आत्तापर्यंत कुणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना याचं दु:ख आहे की तिथे मराठी माणूस हरवला गेला. पण तुम्ही पेढे कसले वाटताय?” असं राऊत म्हणाले.
“तुमचा पक्ष जिंकला असेल, पण मराठी माणसाच्या एकजुटीचा तिथे पराभव झालाय. जे पेढे वाटतायत, त्यांना मराठी जनता माफ करणार नाही. शेकडो लोकांनी बलिदान दिलंय. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ६९ मराठी सैनिकांनी हौतात्म्य दिलंय. बाळासाहेब त्यासाठी तुरुंगात देखील गेले आहेत. पण तुम्ही पेढे वाटताय मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला? राजकारण बाजूला ठेवा पण एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला पेढे वाटताना, जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे”, असं देखील राऊत म्हणाले.