Dombivali : रील बनवताना विहिरीत पडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सध्या सोशल मीडियावर रील बनवून शेअर करण्याचा ट्रेंड वाढला आहे.सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्सच्या नादात अनेकांना अपघात होऊन जीव गमवावा लागत आहे. तरी ही तरुण वर्ग रील बनविण्यासाठी धोका पत्करतात. डोंबिवलीत एका तरुणाला रील बनवणे महागात पडले. डोंबिवलीत रील बनवताना एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
डोंबिवलीच्या जवळ ठाकुर्ली येथे पंप हाऊसच्या खोल विहिरी जवळ एक तरुण रील बनवताना विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बिलाल सोहिल शेख असे या मयत तरुणाचे नाव आहे.
ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मुंब्रा येथे राहणारा मयत बिलाल सोहिल शेख आपल्या दोन मित्रांसह ठाकुर्लीच्या पंप हाऊस येथे रील बनवायला गेला. रील बनवताना त्याचा तोल गेला आणि तो खोल विहिरीत पडला.त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली पण आजूबाजूला कोणीच नसल्याने वेळीच मदत मिळू शकली नाही आणि तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही घटना विष्णूनगर पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचून बिलालचा शोध घेणे सुरु केले. 32 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलांच्या जवानांनी बिलाचा मृतदेह शोधून काढला.मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे.
Edited by - Priya Dixit